श्रीमलंग गडावर सहा महिन्यांत फ्युनिक्युलर रेल्वे
By Admin | Updated: April 24, 2017 02:16 IST2017-04-24T02:16:34+5:302017-04-24T02:16:34+5:30
हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील दीर्घकाळ रखडलेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सहा

श्रीमलंग गडावर सहा महिन्यांत फ्युनिक्युलर रेल्वे
डोंबिवली : हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील दीर्घकाळ रखडलेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सहा महिन्यांत भाविकांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे त्यांना आता गड चढउतार करावा लागणार नाही.
फ्युनिक्युलर रेल्वे सुरू व्हावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत आहेत. डॉ. शिंदे यांनी शनिवारी श्रीमलंगवाडीला भेट देत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी फ्युनिक्युलर रेल्वेचे काम करणारे वसंत जोशी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गटविकास अधिकारी सोनटक्के, अन्य अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
फ्युनिक्युलर रेल्वेचे काम २०१३ पासून रखडले आहे. त्याला गती मिळावी, यासाठी डॉ. शिंदे प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक बैठका झाल्यानंतर आता या कामाला गती मिळाली आहे. ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, असे जोशी यांनी सांगितले. हा प्रकल्प ८० कोटींचा आहे. त्यातील केवळ १० कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिल मिळण्यास दिरंगाई होत असल्याची खंतही या वेळी त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)