अडीच वर्षांपासून फरार असलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:18+5:302021-08-26T04:43:18+5:30
कल्याण गुन्हे शाखेची कारवाई : पोलिसांना देत होता गुंगारा लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : घरफोडीच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार ...

अडीच वर्षांपासून फरार असलेला
कल्याण गुन्हे शाखेची कारवाई : पोलिसांना देत होता गुंगारा
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : घरफोडीच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आकाश ऊर्फ बटल्या राजू सिंग या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
कल्याण-शीळफाटा रोडवरील सोनारपाडा परिसरातील गोदामाचे शटर उचकटून आठ लाख ४३ हजार ९०० रुपयांची रोकड असलेले लॉकर लंपास केल्याची घटना नोव्हेंबर २०१८ मध्ये घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक झाली होती, परंतु आकाश फरार होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोकडपैकी पाच लाख ४५ हजार ९८० रुपये हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात २० जानेवारी २०१९ ला आरोपपत्रही दाखल झाले होते. परंतु, मुख्य आरोपी आकाश फरार होता. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता.
बदलापूरला राहणारा आकाश सतत राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू होता. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार साहायक पोलीस उपनिरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, हवालदार दत्ताराम भोसले, मिथुन राठोड, अर्जुन पवार, संदीप भालेराव, राजेंद्र खिल्लारे, प्रकाश पाटील, सचिन साळवी, मंगेश शिर्के, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग, राहुल ईशी, चित्र इरपाचे, स्वाती काळे आदींनी सापळा लावून फरार आकाशला जेरबंद केले.
दोन दिवसांची कोठडी
आकाश याच्याविरोधात सात घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत. तो रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यात अत्यंत तरबेज असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
------------------------------------------------------