इंधन दरवाढीचे बसताहेत सर्वसामान्यांना चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:19 IST2021-02-12T00:18:57+5:302021-02-12T00:19:43+5:30
गृहिणींचे बजेट कोलमडले; कोरोनामुळे बसला आहे आर्थिक फटका

इंधन दरवाढीचे बसताहेत सर्वसामान्यांना चटके
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून, त्यामुळे सामान्य माणसाला जगणे कठीण होत चालले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी वाढलेले पाहायला मिळतात, तर गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे चटके सामान्य गृहिणींना सहन करावे लागत आहेत.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांचे वेतन रखडले, कोणाचे वेतन कमी झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे उद्योगधंदे बुडाले. या सगळ्यात सामान्य माणूस भरडला गेला. त्याच्यावर सर्वच बाजूने महागाईची कुऱ्हाड कोसळल्याने तो अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या दोन महिन्यांत अचानक वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील खर्चाचे गणित जुळवायचे कसे हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
साधारण नोव्हेंबरमध्ये पेट्रोलचा दर साधारण ८७.७७ रुपये इतका होता. डिसेंबर महिन्यात तो साधारण ८८ रुपयांहून अधिक झाला. नववर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलने नव्वदी पार केली आणि आता तो ९३ रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलच्या दरातही गेल्या चार महिन्यांत ७ ते ८ रुपयांची वाढ होऊन मुंबई- ठाणेतील डिझेलचा सध्याचा दर ८२- ८३ रुपये इतका आहे.
दुसरीकडे गॅस सिलिंडरचे दरही नोव्हेंबर महिन्यात ५९५ रुपये होते. डिसेंबरमध्ये त्यात १०० रुपये वाढ झाली. तर १ फेब्रुवारीपासून पुन्हा त्यात २५ रुपये वाढ झाली. सध्या सिलिंडरचा दर ७२० रुपये आहे.
सोशल मीडियावरही चर्चा
या वाढत्या पेट्रोल दरवाढीचे पडसाद सोशल मीडियावरही पाहायला मिळाले. !पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत, तसेच पगाराचे पण पाहिजे होते, रोज सकाळी पाहिले की वाढलेला दिसला पाहिजे.’ तसेच ‘पेट्रोलचे दर आता १०० रुपये झाले की सगळ्यांनी हेल्मेट काढून वर आकाशाकडे पाहा रे, कारण तशी पद्धतच आहे ना, शंभर धावा झाल्या की हेल्मेट काढून वर आकाशात पाहायचं, असे मेसेज पोस्ट होत होते.
गॅसच्या दरात गेल्या २ महिन्यांत साधारण १२५ रुपयांची वाढ झाली आहे. गॅस साधारण जेमतेम महिनाभर पुरतो. त्यामुळे परवडत नाही. वाढत्या महागाईमुळे आधीच आमच्यासारखी माणसं त्रस्त आहेत. या इंधन दरवाढीने अधिक भरडले जात आहोत.
- रुचा घोगरे, गृहिणी
आधीच कोरोनामुळे कमी वेतनात नोकरी करावी लागतेय. त्यातच पेट्रोलचे दर वाढत आहेत. कामासाठीही गाडीचा प्रवास परवडत नाही. मात्र, महाग होत असले तरी पेट्रोल, डिझेलचा वापर करावाच लागतोय. सामान्यांचा विचार करून इंधन दरवाढ थोडीतरी कमी केली पाहिजे. - देवेश फोंडकर, ठाणे