कल्याणात आता ‘फुकट बाजार डॉट कॉम’
By Admin | Updated: February 15, 2016 02:58 IST2016-02-15T02:58:53+5:302016-02-15T02:58:53+5:30
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कुणावरही करावे’ या कवितेचे ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आचरण करीत आयटी क्षेत्रातील दोन तरुण हर्षद गायकवाड आणि कासम शेख

कल्याणात आता ‘फुकट बाजार डॉट कॉम’
डोंबिवली : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कुणावरही करावे’ या कवितेचे ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आचरण करीत आयटी क्षेत्रातील दोन तरुण हर्षद गायकवाड आणि कासम शेख यांनी ‘फुकट बाजार डॉट कॉम’चा रविवारपासून प्रारंभ केला. यावर झालेल्या खरेदीतून होणाऱ्या नफ्यातील निम्मी रक्कम आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देऊन त्यांच्यावर प्रेम करा, असा संदेश उभयतांनी दिला आहे.
हर्षद गायकवाड हा डोंबिवलीला राहतो, तर त्याचा मित्र कासम शेख हा कल्याणला राहतो. हर्षद हा पवई येथे आयटी कंपनीत कामाला आहे. कासम हा महापे येथील आयटी कंपनीत कामाला आहे. दोघेही आयटी क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी या दोघांनी नामी शक्कल लढविली आहे. हल्ली शहरी भागात प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने प्रत्येक जण आॅनलाइन असतो. साहजिकच, आॅनलाइन खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. या दोघांनी मिळून ‘फुकट बाजार डॉट कॉम’ सुरू केली आहे. तिचा प्रारंभ त्यांनी आज केला आहे. तिच्यासाठी कोणतीही अशी डेडलाइन त्यांनी आखून घेतलेली नाही. या फुकट बाजार डॉट कॉमवरून आॅनलाइन खेरदी केल्यास त्यातून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफ्यातून ग्राहकाला भेटवस्तू तर ५० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे. सध्या फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील आणि शॉपलूज या आघाडीच्या डॉट कॉमवरून ग्राहक आॅनलाइन खरेदी करतात. या चारही वेबसाइटची लिंक फुकटबाजारवर दिली आहे. येथे खरेदी केल्यास त्यातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांसाठी काही मदतीचा हात द्यावासा वाटत असेल तर फुकट बाजारवरून काहीतरी खरेदी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कासम म्हणाला की, फुकट बाजारच्या आॅनलाइन खरेदीतून पाच लाख निधी जमविण्याचे लक्ष्य तूर्तास आम्ही समोर ठेवले आहे. निधी जमा झाल्यावर नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला देण्याचा विचार आहे.