जिल्ह्यातील १८ हजार बालकांना मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:48 IST2020-12-18T00:48:20+5:302020-12-18T00:48:30+5:30
‘आरटीई’ अंतर्गत लाभ : जि.प.ची माहिती

जिल्ह्यातील १८ हजार बालकांना मोफत शिक्षण
ठाणे : दुर्बल घटकातील बालकांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमध्येदेखील ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून चार वर्षांत शहरी व ग्रामीण भागांतील १८ हजार ४२० मुलांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
आरटीई अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील ६५२ अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यांतील शाळांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनीही ऑनलाइनद्वारे आपल्या पाल्यांचे अर्ज शाळा प्रवेशासाठी दाखल केले. २०१६-१७ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली.
सर्वाधिक मुलांना प्रवेश
जिल्ह्यात चार वर्षांत १८ हजार ४२० बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला. २०१९-२० मध्ये सर्वाधिक पाच हजार ८६६ बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे. तर, २०१६-१७ मध्ये सर्वांत कमी दोन हजार ५५४ बालकांनीच प्रवेश घेतला होता.