अंशकालीन नोकरीचे अमिष दाखवून १३ लाख ६० हजारांची फसवणूक; कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: December 22, 2023 18:38 IST2023-12-22T18:38:21+5:302023-12-22T18:38:30+5:30
आरोपींचा शोध सुरु

अंशकालीन नोकरीचे अमिष दाखवून १३ लाख ६० हजारांची फसवणूक; कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा
ठाणे: अंशकालीन नोकरीचे अमिष दाखवून त्याद्वारे वेगवेगळया टास्कद्वारे कळव्यातील अक्षय नाईक (२९) यांच्या बँक खात्यातून १३ लाख ६० हजारांची रोकड काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी शुक्रवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२३ या दरम्यान अक्षय उल्हास नाईक यांना एका अनोळखी मोबाईलधारक भामटयाने व्हॉटसअॅपवर संपर्क साधला. त्याने त्यांना पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखविले. त्यानंतर या भामटयाने त्यांना वारंवार मेसेज करुन वेगवेगळे टास्क दिले. या टास्कसाठी त्यांच्या कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक खात्यातून १३ लाख ६० हजारांची रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगितली.
आपल्याला यामध्ये मोठा फायदा होईल, या आशेपोटी नाईक यांनी ही रक्कमही ऑनलाईन संबंधित व्यक्तीला पाठविली. मात्र, त्यांना कोणताही मोबदला न देता, त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली १३ लाख ६० हजारांची रक्कम परत न मिळाल्याने नाईक यांनी अखेर याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे २१ िडसेंबर राेजी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मंडलिक हे करीत आहेत.