उल्हासनगरात बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक; जागा हडपण्यासाठी रचला कट
By सदानंद नाईक | Updated: July 26, 2023 18:35 IST2023-07-26T18:35:03+5:302023-07-26T18:35:14+5:30
कॅम्प नं-४, नेताजी चौकातील एका जागेचे बनावट मृत्युपत्र बनवून जागा स्वतःच्या नावे करीत त्याची विक्री केल्याची घटना उघड झाली.

उल्हासनगरात बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक; जागा हडपण्यासाठी रचला कट
उल्हासनगर : कॅम्प नं-४, नेताजी चौकातील एका जागेचे बनावट मृत्युपत्र बनवून जागा स्वतःच्या नावे करीत त्याची विक्री केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ८ जणांपेक्षा जास्त जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४, नेताजी चौकातील महापालिका प्रभाग समिती कार्यालय व अग्निशमन विभागाच्या कार्यालया समोरील यु नंबर-८, शिट नं-४८ या जागेचा ताबा सुमित श्यामलाल वाधवा यांच्या ताब्यात होता.
दरम्यान, रवी किशनलाल शर्मा व संगीता राजेश शर्मा यांनी १ जानेवारी २०२२ नंतर दर्शनलाल गणपत शर्मा व किसनलाल गणपत शर्मा हे एकच व्यक्ती असल्याचे भासवून बनावट मृत्यू दाखला तयार करून व तो खरा असल्याचे भासवून नगर भूमापन व प्रांत अधिकारी कार्यालय येथे वापरून सदर जागा स्वतःच्या नावाने केली. सदर जागेचा विकास करून संगनमत करून रवी शर्मा, संगीता शर्मा, अनुपकुमार गोलानी, मनीषा गोलानी, राजपाल वाधवा, हेमा लोहना, राजकुमार नागपाल, दीपक पंजाबीसह इतरांनी विक्री करून फसवणुक केली. अशी तक्रार सुमित वाधवा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.