सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपा व शिंदेसेनेत माजी नगरसेवकांची तोडफोड सुरू असताना भाजपा निष्ठावंत गटाचे दिग्गज माजी नगरसेवक ओमी कलानी गटाच्या गळाला लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा टीओकेत प्रवेश घेतल्याची माहिती ओमी कलानी यांनी देऊन ते टीओकेच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेना, ओमी कलानी गट, साई पक्ष उभा ठाकल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उद्धवसेना, मनसे, काँग्रेस अशी आघाडी बनत आहे. भाजपाचे प्रभाग क्रं-१९ मधील नगरसेवक मीना सोंडे, किशोर वनवारी यांच्यासह अन्य दोन सहकारी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित गुरुवारी प्रवेश केला. तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक शुभांगी बहेनवाल यांनी भाजपात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. भाजप व शिंदेसेना हे एकमेकांचे नगरसेवक फोडाफोडी करीत आहेत. तर दुसरीकडे ओमी कलानी यांनीही शिंदेसेनेच्या मदतीने भाजपचे निष्ठावंत गटाचे व माजी शहरजिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखीजा व राम चार्ली पारवानी यांना गळाला लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित टीओके मध्ये प्रवेश केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांना भाजपाच्या माजी नगरसेवक प्रवेशाबाबत विचारणा केली असता, जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, प्रकाश माखीजा व राम चार्ली पारवानी हे सकाळ पर्यंत संपर्कात होते. दुपारनंतर त्यांच्या सोबत संपर्क तुटल्याचे वधारिया म्हणाले. काही दिवसापूर्वी भाजपा निष्ठावंत गटाचे जमनुदास पुरस्वानी यांनी नवनिर्वाचित भाजपा शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उठवून, उद्धवसेनेचे शहर पश्चिम प्रमुख बैस यांना भाजपात प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ कोर कमिटी व निवड समिटी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. जमनूदास पुरस्वानी यांच्यासह अन्य सदस्यांनीही राजीनामा दिल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्याचाच परिणाम पुरस्वानी यांच्यासह अन्य जणांनी भाजपाला रामराम ठोकल्याचे बोलले जाते.