ठाणे - ठाण्यातील कोलशेत येथील खाडी किनारी गुरुवारी रात्री चार संशयित इसम आढळल्याने खळबळ उडाली आहे. इथूनच स्फोटकांसाठी वापरले जाऊ शकणारे अमोनिया नायट्रेट एका बाटलीत द्रव्य स्वरूपात आढळले. पोलिसांसह नौदलानेही खाडी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे.कोलशेत येथील खाडी किनारी याच भागातील एक रहिवासी गेला असता रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास त्याला ४ संशयित इसम दिसले. चौघांचीही शरीरयष्टी धिप्पाड होती. त्यांच्या पाठीवर बॅगहि होत्या. कोलशेत भागातच एअर फोर्स स्टेशन आहे. या जागरूक रहिवाशाने तातडीने एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना हि बाब सांगितली. एअर फोर्सने पोलिसांसह नौदलाला हि माहिती लगेच दिली. त्यानंतर संशयित इसमाची शोध मोहीम वेगात सुरु करण्यात आली. खाडीच्या पलीकडे भिवंडीचा भाग सुरु होतो आणि एकीकडे वर्सोवा परिसर आहे. या भागातही पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. संपूर्ण खाडी परिसरात पोलीस, जलद कृती दल, एअर फोर्स आणि नौदलाने बंदोबस्त लावला आहे.
ठाण्यात खाडी किनारी चार संशयित आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 09:15 IST