मारियाच्या अटकेसाठी चार पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 05:04 IST2018-04-24T05:04:47+5:302018-04-24T05:04:47+5:30
घाटकोपर येथील व्यावसायिक सुरेश डोडिया यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन कोटी रुपयांना लुबाडले होते.

मारियाच्या अटकेसाठी चार पथके रवाना
ठाणे : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारी मारिया सुसाईराज हिला अटक करण्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने चार पथके गठीत केली आहेत. ही पथके वेगवेगळ्या दिशांनी रवाना झाली.
घाटकोपर येथील व्यावसायिक सुरेश डोडिया यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन कोटी रुपयांना लुबाडले होते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. खंडणीविरोधी पथकाने गत आठवड्यात त्यापैकी चार आरोपींना अटक केली. अभिनेत्री मारिया सुसाईराजसह नऊ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ती कर्नाटकातील मंगळुरू येथे शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती मध्यंतरी खंडणीविरोधी पथकास मिळाली होती. मात्र, पोलिसांनी सूत्रांकडून खातरजमा केली असता, ती माहिती चुकीची असल्याचे समजले. त्यानंतर, पोलिसांना काही सूत्रांकडून मारियाची खात्रीलायक महिती मिळाली. त्यानुसार चार वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. गोपनीयतेच्या कारणास्तव पथके नेमक्या कोणत्या शहरांमध्ये गेली, याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.