उल्हासनगरमध्ये चार फिरती स्वच्छतागृहे
By Admin | Updated: March 22, 2017 01:23 IST2017-03-22T01:23:48+5:302017-03-22T01:23:48+5:30
शहर हगणदारी मुक्त करण्याचा उपक्रम महापालिका राबवित आहे. शहाड गावठण, करोतियानगर, राजीव गांधीनगर

उल्हासनगरमध्ये चार फिरती स्वच्छतागृहे
उल्हासनगर : शहर हगणदारी मुक्त करण्याचा उपक्रम महापालिका राबवित आहे. शहाड गावठण, करोतियानगर, राजीव गांधीनगर, डम्पिंग ग्राउंड आदी चार ठिकाणी फिरते स्वच्छतागृह दिले आहेत. उघडयावर प्रार्तविधी करणाऱ्यां विरोधात कारवाईचे संकेत मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिले. तसेच वैयक्तिक स्वच्छतागृहाला मंजुरी देण्यात येत असून २५०० स्वच्छतागृह ३१ मार्च अखेर बांधून पूर्ण होणार असल्याची त्यांनी सांगितले.
उल्हासनगर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचाऱ्यांचे गुड मॉर्निंग पथक स्थापन केले होते. उघडयावर विधीसाठी बसणाऱ्या नागरिकांना हे पथक गाठून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांना त्वरित वैयक्तीक स्वच्छतागृह मंजूर केले. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याचा सल्ला दिला. तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती हाती घेऊन वीज व पाणीपुरवठा सुरू केला. गरज असेल तेथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा धडाका पालिकेने सुरू केला. याप्रकाराने उघडयावर विधी करणाऱ्यांची संख्या कमी होऊन चार ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले.
महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली. नवनियुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून कानमंत्र दिला.
आजही कॅम्प नं-१ व २ परिसरातील मुकुंदनगर, एमआयडीसी बिर्ला मंदिरामागील झोपडपट्टी, शहाड गावठण परिसर, राजीव गांधीनगर, डॉल्फिन क्लब, करोतियानगर, शांतीनगर हिंदू स्मशानभूमी परिसरात उघडयावर विधीस बसायचे. त्यामुळे या भागात फिरते स्वच्छतागृह दिले असून जागा असेल तेथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)