Four minors arrested in corporator assault case | नगरसेवक मारहाणप्रकरणी चार अल्पवयीन मुले ताब्यात

नगरसेवक मारहाणप्रकरणी चार अल्पवयीन मुले ताब्यात

मीरा रोड : भाईंदर पूर्वेचे ज्येष्ठ भाजप नगरसेवक रोहिदास पाटील यांना मारहाण करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना सोमवारी नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही मुले १३ ते १४ वयोगटातील असून दुचाकी भरधाव चालविण्यावरून पाटील यांनी हटकले असता त्यांना मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या एका बंगल्यात रोहिदास पाटील राहतात. शनिवारी रात्री पाटील हे बंगल्याबाहेर खाडीच्या बाजूने असलेल्या ठिकाणी बसले होते. तेव्हा काही अल्पवयीन मुले बेशिस्तपणे दुचाकी चालवत होती. याबाबत पाटील यांनी त्यांना असे न करण्याविषयी बजावले. त्यावरून झालेल्या बाचाबाचीदरम्यान एका मुलाने पाटील यांच्या नाकावर ठोसा मारला. त्यात त्यांचे नाकाचे हाड मोडले. पाटील यांना मारहाण करून ती चारही मुले पळून गेली. पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या मुलांना शाेधून काढले. या आरोपींना बालसुधारगृहात पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Four minors arrested in corporator assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.