ठाण्यात झाड पडून चौघे जखमी; मायलेकींचा समावेश, खारटन रोड भागातील घटना
By जितेंद्र कालेकर | Updated: May 12, 2024 17:55 IST2024-05-12T17:54:23+5:302024-05-12T17:55:24+5:30
खारटन रोड भागातील घटना: उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ठाण्यात झाड पडून चौघे जखमी; मायलेकींचा समावेश, खारटन रोड भागातील घटना
ठाणे : खारटन रोड परिसरातील खंडोबा मंदिराजवळ, जवाहरबाग अग्निशमन केंद्राच्या मागे फुल विक्रीच्या एका लहान दुकानावर मोठे झाड पडल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत खारटन रोड परिसरातील मेघना अडसुळे (४५) यांच्यासह उनत्ती (१६) आणि सांची (१५) या मायलेकींसह उमेश होनमाने (७५) असे चौघे जण जखमी झाल्याची घटना निदर्शनास आली आहे.
चौघांनाही उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. खारटन रोडवरील या घटनेत सांची हिला मुक्का मार लागला असून इतर तिघांना दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली होती. तसेच ते झाड कापून एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.