समस्यांचा सर्वच पक्षांना विसर

By Admin | Updated: February 13, 2017 04:50 IST2017-02-13T04:50:10+5:302017-02-13T04:50:10+5:30

उल्हासनगर शहर विकास व कलानी मुक्तशहर,’ असा नारा २००७ तसेच २०१२ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाने दिला होता.

Forget about all the aspects of the problem | समस्यांचा सर्वच पक्षांना विसर

समस्यांचा सर्वच पक्षांना विसर

उल्हासनगर शहर विकास व कलानी मुक्तशहर,’ असा नारा २००७ तसेच २०१२ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाने दिला होता. मात्र त्यांना १० वर्षांत विकासासह कलानीमुक्त शहर करता आले नाही. शहरातील समस्याही कायम आहेत. दरवेळेचा तोच तोच वचननामा प्रत्येक पक्ष पुढे करत असल्याने नागरिकांकडून टीका होते. त्यामुळेच यंदा शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, साई, रिपाइं अशा सर्वच पक्षांनी वचननाम्याला फाटा दिल्याचे बोलले जात आहे. ऐन मतदानाच्या दोन दिवस अगोदर थातूर-मातूर वचननामा काढून शहरवासीयांच्या डोळ््यांत धूळफेक केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपाने खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ व सुंदर शहर, पर्यायी डम्पिंग ग्राउंड, महापालिकेची परिवहन सेवा, भुयारी गटार योजना, खेमानी नाला, कचरामुक्त शहर, अद्ययावत रुग्णालय, कॉलेज, शिवसेनाप्रमख ठाकरे यांच्या नावाने क्रीडांगण, दसरा मैदान येथे तालुका क्रीडासंकुल, मुबलक पाणी, डिजीटल पालिका शाळा, टँकरमुक्त शहर आदी अनेक घोषणा वचननाम्यात दिल्या होत्या. मात्र, अंमलबजावणी शून्य.
दुसरीकडे महापालिकेतील विविध विभागांतही कमालीचा गोंधळ आहे. भ्रष्ट काराभारामुळे मागील वर्षी १८ कर्मचारी व अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात अडकले. त्यात तत्कालीन महापौर व आयुक्तांचे स्वीय सहायक, नगररचनाकार, सहायक आयुक्त होते. तसेच कर विभागातील भष्ट्राचाराप्रकरणी तत्कालीन उपायुक्तांसह अनेक जणावंर गुन्हा दाखल झाला. एलबीटी विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळवता आले नाही. त्याचा ठपका ठेवून याप्रकरणी तात्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी १८ जणांना निलंबीत तर ४८ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. पालिकेतील या अनागोंदीला सत्ताधारी शिवसेना-भाजपाच जबाबदार आहे. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने वाटलेल्या गरोदर महिलांच्या पोषण आहारात किडे सापडले. या विभागाप्रमाणे अनेक विभाग वादात सापडले आहेत. त्यामुळे शहराला युतीने १० वर्षे मागे नेल्याची टीका होत आहे.
ओमी कलानी यांनी राष्ट्रवादीत बंड करून ओमी टीमने शहर विकास आघाडीची स्थापना केली. मात्र ऐन निवडणुकीपूर्वी ही आघाडी भाजपामध्ये विलीन झाली. ‘मेरी भी चूप, तेरी भी चूप’या प्रमाणे सत्ताधारी व विरोधकांनी पालिकेला ओरबडे आहे. येथील बहुंताश नगरसेवक ठेकेदार बनून कोट्याधीश झाल्याची चर्चा शहरात होत आहेत.
पाणीटंचाई, डम्पिंग ग्राउंड, गटारे, रस्ते या मूलभूत सोयी-सुविधा शहरात आवासून उभ्या आहेत. पण शहराचा विकासच ठप्प झाल्याने येथील नागरिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यात सुरुवात केली. सत्ताधारी व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहर बकाल झाले. पण आजवर कोणत्याच पक्षाला शहराचं सोयरसुतक नव्हते. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत कोणता वचननामा नागरिकांसमोर ठेवायचा, असा गंभीर प्रश्न सर्वच राजकीय पक्षांपुढे पडला. आठ दिवसांवर मतदानाचा दिवस येऊन ठेपल्यावर कोणताही पक्ष वचननामा प्रसिद्ध करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
महापौराचे भाजप व शिवसेनाला स्वप्न महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा, शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळेच भाजपाने वादग्रस्त ओमी टीमशी सुरुवातीला आघाडी केली. नंतर या आघाडीला आपल्यात विलीन करून घेतले. ओमी टीम व भाजपाचे ४० नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे एकहाती सत्ता मिळेल, असा वरिष्ठ नेत्यांचा दावा आहे. तसेच स्वप्न शिवसेनेला पडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची अवस्था असून नसल्यासारखी झाली. साई पक्षाच्या हातात सत्तेची चावी पुन्हा जाणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
अनेक योजना अर्धवट
एक दशकाचा सत्ताकाळ भाजप व शिवसेनेला मिळूनही शहरातील ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. सरकारचा बेकायदा बांधकामाचा अध्यादेश, ३२ कोटींचा खेमानी नाला, २४ कोटीची कामगार गृहसंकूल, अग्निशमन दलाची इमारत, पालिका प्रशासकीय इमारत, १७ कोटींचा शहाड -पालिका रस्ता, कचरा उचलण्याचा ठेका आदी असंख्य कामे अर्धवट आहेत.
वचननाम्यात लिहायचे तरी काय?
१० वर्षांत शहराचा कोणताच विकास झाला नसल्याने वचननाम्यात लिहायचे तरी काय? असा प्रश्न सेनेसह भाजपा-ओमी टिम, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादीला पडला. त्यामुळेच मतदानाच्या तीन-चार दिवस आधी वचननामा प्रसिध्द करण्याचे सर्वच पक्षांनी ठरवले आहे. यात मुबलक पाणी, चकाचक रस्ते, टँकरमुक्त शहर, हे अन् असेच मुद्दे असतील.

Web Title: Forget about all the aspects of the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.