आदिवासी शेतकऱ्यांना महिनाभरात वनपट्टे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:46+5:302021-03-23T04:42:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येऊर परिसरातील कोकणीपाडा येथील आदिवासींचे वनपट्टे, शेतीचे दावे याबाबत अंतिम निर्णय होऊनही ते धूळखात ...

Forest lease certificate to tribal farmers within a month | आदिवासी शेतकऱ्यांना महिनाभरात वनपट्टे प्रमाणपत्र

आदिवासी शेतकऱ्यांना महिनाभरात वनपट्टे प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येऊर परिसरातील कोकणीपाडा येथील आदिवासींचे वनपट्टे, शेतीचे दावे याबाबत अंतिम निर्णय होऊनही ते धूळखात पडून आहेत. काही वर्षांपासून सतत पाठपुराव करूनही आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्ट्याचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. यामुळे संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारी उपोषण केले. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी महिनाभरात वनपट्टे दाव्यांचे प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले.

कोकणीपाडा वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वनपट्टे दावे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोमवारी शासकीय विश्रामगृहाजवळ एक दिवसीय उपोषण केले. आदिवासी शेतकऱ्यांनी उपोषणास प्रारंभ करताच जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची त्वरित दखल घेऊन शिष्टमंडळास भेट दिली. वर्षभरापासून या वनपट्ट्यांचे अंतिम निर्णय झालेले आहेत. मात्र, त्यांचे प्रमाणपत्र वाटप रखडलेले आहे. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता या शेतकऱ्यांचे वनपट्टे ठाणे महापालिका हद्दीतील प्राधिकरण आणि नाशिक येथील आदिवासी एकता प्रकल्प आयुक्त या नोडल अधिकाऱ्यांच्या चर्चेअभावी रखडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात प्रमाणपत्र वाटप केले जाईल, असे आश्वासन दिल्याचे उपोषणकर्ते जयराम राऊत यांनी सांगितले.

राज्यभरापैकी शहरी भागातून प्रथमच ठाणे महापालिका हद्दीतील वनहक्क समितीच्या वनपट्टे दाव्यांवर अंतिम निर्णय झाला आहे. मात्र त्यांचे प्रमाणपत्र वितरण रखडले आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोकणीपाडा वन हक्क समितीच्या नेतृत्वाखाली व श्रमिक मुक्ती संघटनेच्या पाठिंब्यासह उपोषण सुरू केले होते. या उपोषणात समितीचे अध्यक्ष रामचंद्र गावंडे, यराम राऊत, मनीष मोवळे, प्रभू चौधरी, महादू गावित, परशुराम दळवी, सुंदरबाई महाले, सुरेखा पाजी, अनसूया महाले आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

......

Web Title: Forest lease certificate to tribal farmers within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.