परदेशींनी वरिष्ठांना दिली होती आत्महत्येची पूर्वकल्पना...
By Admin | Updated: June 29, 2017 20:48 IST2017-06-29T20:48:28+5:302017-06-29T20:48:28+5:30
ठाण्याच्या शिधा वाटप विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रकाश परदेशी (५६) यांनी आपण आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पना त्यांचे वरिष्ठ अधिकारी संगीता टकले यांना एक महिन्यापूर्वीच दिली

परदेशींनी वरिष्ठांना दिली होती आत्महत्येची पूर्वकल्पना...
ऑनलाइन लोकमत/जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 29 - ठाण्याच्या शिधा वाटप विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रकाश परदेशी (५६) यांनी आपण आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पना त्यांचे वरिष्ठ अधिकारी संगीता टकले यांना एक महिन्यापूर्वीच दिली होती. पहिल्या पत्नीपासून विभक्तपणा, दुसऱ्या महिलेकडूनही फारसा प्रतिसाद न मिळणे आणि त्यातच आई वडिलांचे अलिकडेच निधन. या सर्वच कौटुंबिक कलहातून आलेल्या वैफल्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष नौपाडा पोलिसांच्या तपासात पुढे आला आहे.
बुधवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास आपल्याच उपनियंत्रक कार्यालयात आत्महत्या केलेल्या परदेशी यांच्याबाबतीतील वेगवेगळी माहिती आता समोर येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी कार्यालयात न कळवताच ८ मे २०१७ पूर्वी सलग दोन आठवडयांची सुटी घेतली होती. शिधा वाटप विभागाचा वाढता ताण, त्यात अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ यामुळे विनापरवानगी रजा घेणाऱ्या परदेशींना त्यावेळी शीधा वाटप विभागाच्या उपनियंत्रक संगीता टकले यांनी चांगलेच फैलावर घेतले होते. त्याचवेळी परदेशींनी कौटुंबिक समस्येत असून येत्या काही दिवसांतच आपण आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. तेंव्हा डॉ. राहूल दत्ता यांच्याकडे उपचार घेण्याचा त्यांनी परदेशींना सल्ला दिला. त्यानुसार ते त्यांच्याकडे गेलेही होते. आता यातून ते बरे झाले असतील, अशा समझूतीमध्ये असलेल्या टकले यांना बुधवारी अचानक हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. परदेशींनी टकले यांना याच संदर्भात मोबाईलवरुन केलेले मेसेजही पोलिसांनी अधिकृत जबाबात घेतले आहेत. पहिल्या पत्नीशी त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. मात्र तिच्याशी ते गेल्या १५ वर्षांपासून विभक्त होते. आता गावी जाऊन पुन्हा लग्न करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला होता. त्यात स्वेच्छानिवृत्ती घेऊन आई वडीलांबरोबर राहण्याचाही त्यांचा इरादा होता. पण, तत्पूर्वीच आई वडिलांचेही निधन झाले. पहिली पत्नी कांदीवलीतच त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावरच वास्तव्याला आहे. एक मुलगा पायलट तर दुसरा इंजिनियर आहे. पायलट मुलगा पत्नीकडे तर इंजिनियर हा त्यांच्याबरोबर होता. एकत्र असतांना पत्नीशी नेहमीच त्यांचा वाद व्हायचा. तिलाही तिच्या मित्राने त्यांच्याच घराजवळ घर घेऊन दिल्यामुळे त्यांच्यातील वादाला हेही एक कारण होते, अशीही माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. ओळख होती पण लग्न झाले नव्हते... दरम्यान, ज्या महिलेमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे परदेशींनी आपल्या तीन वेगवेगळया चिठ्ठयांमध्ये म्हटले आहे. तिने मात्र, परदेशी यांच्याशी एकाच खात्यात असल्यामुळे त्यांच्याशी केवळ चांगली ओळख होती. २०१० ते २०१७ या सात वर्षात त्यांच्याशी कोणताच संपर्क नव्हता. त्यांचे वागणे विचित्र होते. लग्न करण्यासाठी ते मागे लागले होते, असा दावा पोलिसांकडे केला आहे. आता आपल्या मुलांच्या लग्नाचे वय असल्यामुळे लग्नाला नकार दिला. तरीही त्यांनी तू माझी आणि माझीच रहाशील... असे चिठ्ठीत म्हणून टेबलावरही तिचे फोटो ठेवले होते. तिने त्यांचा पिच्छा सोडविण्यााठी कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि महिला आयोगाकडेही तक्रार केल्यानंतर परदेशींनी मात्र शेवटचे टोक गाठत.. आपली जीवनयात्राच संपविल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
दुसऱ्या लग्नाचा पुरावाच नाही...
परदेशींनी आपल्या चिठ्ठीत त्यांच्या सहकारी महिलेशी चार वेळा लग्न केल्याचे म्हटले असले तरी त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. शिवाय, या महिलेनेही त्यास दुजोरा दिलेला नाही. कुटूंबात आलेले एकाकीपण, त्यातून मानसिक वैफल्यता यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीही त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र, हाताच्या नसा कापण्यासह नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
पहिली पत्नी आलीच नाही
परदेशी यांच्यापासून विभक्त राहणारी त्यांची पत्नी या घटनेनंतर मात्र कुठेही पोलिसांकडे किंवा शासकीय रुग्णालयातही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आली नाही. मात्र तिच्याकडे असलेल्या मुलानेच आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. तर परदेशींनी आरोप केलेल्या महिलेसह शीधा वाटप कार्यालयात काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही जबाब नोंदविण्याचे काम पोलीस करीत होते.
बदलीच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाला आत्महत्येचा ‘सीन’
ठाण्याच्या शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयात नागपूर येथून नव्यानेच बदली होऊन आलेले नरेश वंजारी यांना मात्र आपल्याच कार्यालयातील सहाय्यक नियंत्रक प्रकाश परदेशी यांच्या आत्महत्येचा ‘सीन’ पाहण्याची वेळ ओढवली. त्यामुळे त्यांनी बुधवारी पदभार न स्वीकारताच घरी परतले. ठाण्याच्या शिधा वाटप उपनियंत्रक यांची बदली रायगड जिल्हयात झाली आहे. तर त्यांच्या जागी वंजारी यांची बदली राज्य शासनाने केली आहे. बदलीच्या ठिकाणी वंजारी बुधवारी हजर होण्यासाठी आले. मात्र, कार्यालयातील रमेश या शिपायापाठोपाठ सहाय्यक शिधा वाटप अधिकारी शशीकांत भोईर यांची झालेली धावाधाव पाहून तेही आवाक झाले. त्यानंतर त्यांना परदेशी यांच्या आत्महत्येचा प्रकार समजला. या सर्व धावपळीमुळे त्यांनी पदभार स्वीकारलाच नाही. तर ज्यांना पदभार सोडायचा होता, त्या संगीता टकले यांनाही बदलीच्या ठिकाणी जाण्याऐवजी कार्यालयात घडलेल्या या प्रकाराची चौकशी करण्यापासून ते पोलिसांना जबाब देण्यापर्यंत सर्वच प्रक्रीयेला तोंड देण्याची वेळ ओढवली. गुरुवारीही टकले यांच्याकडे याचसंदर्भात चौकशी केली. परदेशी यांचा वैयक्तिक कौटुंबिक वाद आणि त्यांना आलेल्या एकाकीपणातून मानसिक संतूलनाचा भाग वगळता त्यांचे कार्यालयातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांशी वर्तन अत्यंत चांगले होते. ते प्रामाणिक आणि कामातही चांगले होते. उत्साहाच्या भरात कार्यालयात ते सर्वांसाठी काहीतरी अल्पोपहाराचीही व्यवस्था करायचे, अशी माहिती टकले यांनी गुरुवारी पोलिसांना दिली. दरम्यान, गुरुवारी मात्र वंजारी यांनी टकले यांच्याकडून धीरगंभीर वातावरणातच उपनियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारली.
सागरची दांडी
परदेशी यांच्या कॅबिनमध्ये त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहणारा त्यांचा सागर हा कर्मचारी प्रचंड भेदरला. तशाच अवस्थेत तिथून त्याने पळ काढला. कार्यालयातील इतर कर्मचारीही भेदरले. सागरने त्यांच्या एका नातेवाईकालाही काही दिवसांपूर्वी अशाच अवस्थेत पाहिले होते. आता हा दुसरा प्रकार पाहून भेदरल्यामुळे तो गुरुवारी कामावरच आला नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.