महापालिका उभारणार चिमण्यांसाठी खाद्यघरटी
By Admin | Updated: March 21, 2017 01:48 IST2017-03-21T01:48:17+5:302017-03-21T01:48:17+5:30
सर्वच ठिकाणी काँक्रिटचे जंगल उभे राहू लागल्याने शहरातील वन्यजीवही कमी होऊ लागले आहेत. त्यात चिमण्या तर दिसेनाशा

महापालिका उभारणार चिमण्यांसाठी खाद्यघरटी
ठाणे : सर्वच ठिकाणी काँक्रिटचे जंगल उभे राहू लागल्याने शहरातील वन्यजीवही कमी होऊ लागले आहेत. त्यात चिमण्या तर दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळेच आता ‘चिमणी बचावा’साठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला असून महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरातील झाडांवर खाद्याची भांडी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधली आहेत. हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवला जावा, यासाठी अर्थसंकल्पात पाच लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी आयुक्तांनी दिली.
ठाण्यात काँक्रिटीकरणाचे प्रमाण वाढू लागल्याने पक्षांचे अस्तित्वदेखील धोक्यात येऊ लागले आहे. त्यातही चिमण्या नाहीशा होऊ लागल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांकडून चिमणी बचावासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शहरात अशाच प्रकारे कार्यरत असलेल्या ठाणे सिटीझन फोरमच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून ‘चिमणी वाचवा’ अभियान राबवले जात आहे. यात वर्तकनगर भागातील लक्ष्मी रेसिडेन्सी, नीलकंठ तसेच आसपासच्या गृहसंकुलांमध्ये चिमणी व अन्य पक्षांकरिता आतापर्यंत ४०० हून अधिक खाद्याची भांडी बसवण्यात आली आहेत. या उपक्रमानंतर या संस्थेने महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात हे अभियान राबवण्याचा निर्धार केला आहे.
सोमवारी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. कचराळी तलाव आणि पालिका मुख्यालयातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील झाडांवर चिमणी व अन्य पक्ष्यांकरिता खाद्याची भांडी बसवण्यात आली. आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन ही भांडी या झाडांवर बांधली. (प्रतिनिधी)