भिवंडीच्या पाण्याला पाठपुराव्याचा खोडा
By Admin | Updated: February 22, 2016 00:38 IST2016-02-22T00:38:26+5:302016-02-22T00:38:26+5:30
महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी बनविलेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून लाल फितीत अडकली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा

भिवंडीच्या पाण्याला पाठपुराव्याचा खोडा
भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी बनविलेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून लाल फितीत अडकली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्याचे सूत्राकडून समजते. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
महानगरपालिका क्षेत्रात विकास होत असताना वाढत्या लोकसंख्येसाठी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेस भातसा धरणातून १०० एमएलडी पाणी मंजूर झाले असून ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बनविली असून ती सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी मुंबई मनपाकडून ४० एमएलडी, स्टेमकडून ७३ एमएलडी व वऱ्हाळा तलावामधून २ एमएलडी असे एकूण ११५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार भविष्यात लागणाऱ्या पाण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मनपाने खाजगी सहकारी भागीदारी तत्त्वावर १०० एमएलडी पाण्याची योजना केली आहे. भातसा धरणातून पिसे येथील बंधाऱ्यातून १०० एमएलडी पाणी घेऊन ते कार्यान्वित करणे व वारणा नाल्यावर खडकीखुर्द येथे मध्यम आकाराचे धरण बांधणे, अशी योजना आहे. तसेच शहराच्या आजूबाजूच्या नदी-खोऱ्याचे सर्वेक्षण करून नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करून ५७१.११ कोटींचा प्रकल्प अहवाल महासभेपुढे ठेवला होता. तेव्हा विशेष हेतू यंत्रणेमार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी दिली. मनपाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम मे.एस.पी.एम.एल. इन्फ्रा लि. यांना वारणा व भातसा पिसे धरण बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर कार्यान्वित करण्याची मान्यता महासभेने नोव्हेंबर २००७ मध्ये दिली. या ठरावानुसार डिसेंबर २००९ मध्ये करारनामा करण्यात आला. हा प्रकल्प राबविण्यासाठी विलंब होणार असल्याने वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेला १०० एमएलडी पाणीपुरवठा तातडीने भातसा धरणातून मंजूर करण्यासाठी मनपाव्दारे मार्च २०१२ मध्ये शासनास पत्र पाठविले. शासनस्तरावर अनुकूल निर्णय होऊन १०० एमएलडी पाणी मंजूर करण्यात आले. या शासन निर्णयाप्रमाणे मूळ प्रकल्पांचा समावेश असलेला फेर विस्तृत प्रकल्प अहवाल मनपाव्दारे तयार करून ५६८ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
स्वतंत्र योजनेनंतरच पाणीप्रश्न निकाली निघणार
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या मंजुऱ्या तत्कालीन आयुक्तांनी प्राप्त करून घेतल्या आहेत.मनपा महासभा ठरावाच्या व शासनाकडून मंजूर सवलत करारनाम्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेस भातसा धरणातील १०० एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा पिसे येथून उपसा करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे कार्य विशेष हेतू यंत्रणेमार्फत राबविण्यासाठी मान्यता देऊन मंजुरी मिळावी, अशा मागणीचे पत्र तत्कालीन आयुक्त जीवन सोनावणे यांनी आॅक्टोबर २०१३ साली राज्याच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे. शहरात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांचे मोर्चे पालिकेत येत असताना विद्यमान आयुक्त व लोकप्रतिनीधींनी या प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तर स्वतंत्र पाणीयोजना निर्माण होऊन पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली
निघणार आहे.