अतिरिक्त वसुलीवर फलकाचा उतारा

By Admin | Updated: August 10, 2015 23:09 IST2015-08-10T23:09:19+5:302015-08-10T23:09:19+5:30

निश्चित दरापेक्षा जास्त दराने बाजार फी वसूल होत असल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने मीरा-भार्इंदर पालिका कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

Flood transit on extra recovery | अतिरिक्त वसुलीवर फलकाचा उतारा

अतिरिक्त वसुलीवर फलकाचा उतारा

- राजू काळे,  भार्इंदर
निश्चित दरापेक्षा जास्त दराने बाजार फी वसूल होत असल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने मीरा-भार्इंदर पालिका कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासनाकडून बाजार परिसरात निश्चित दराप्रमाणेच बाजार फी देण्याचे माहिती फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तत्कालीन महासभेने फेरीवाल्यांकडून प्रति चौरस मीटर जागेच्या वापरापोटी २५ रु. प्रति दिवसाप्रमाणे बाजार फी वसुलीला मान्यता दिली आहे. परंतु, पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून निश्चित दरापेक्षा जास्त दराने बाजार फी वसूल होत असल्याने त्रस्त फेरीवाल्यांनी प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
फेरीवाला संघटनेतील राजकीय तसेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हित ठेकेदारांकडून जोपासले जात असल्याने फेरीवाल्याच्या तक्रारींकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या ठेकेदारांकडून ठेका घेतेवेळी जमा केली जाणारी अनामत रक्कमही बोगस असल्याचे अनेकदा उघड झालेले असतानाही प्रशासनाने त्यावर पांघरूण घालून बाजार फी च्या जाचक वसुलीला प्रत्यक्षात पाठिंबा देत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. ठेकेदारांच्या या जाचक वसुलीला कंटाळून भार्इंदर पश्चिमेकडील आठवडाबाजारातील एका फेरीवाल्याने ठाणे एसीबी (अ‍ॅण्टी करप्शन विभाग) कडे ३ आठवड्यांपूर्वी तक्रार केली होती.
ठेकेदारांना एसीबीची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रशासनाला ठेका परवडत नसल्याचे कारण देत वसुली बंद केली. हा महसूल बुडू नये, यासाठी प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांसह शिपायांना वसुलीच्या कामाला जुंपले. त्यातील राकेश कारभारी त्रिभुवन या शिपायानेसुद्धा २५ रु. या निश्चित दराखेरीज ३० रु. वसूल करून फेरीवाल्याला पावती न देता रकमेचा अपहार करताना एसीबीने २६ जुलैला रंगेहाथ पकडले.
यात पालिकेच्या कर्मचाऱ्याचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने निश्चित दराप्रमाणे वसुली व्हावी, यासाठी बाजार परिसरात फेरीवाल्यांच्या माहितीस्तव फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यात प्रति चौरस मीटरला २५ रु.प्रमाणे अतिरिक्त जागेच्या वापरानुसार बाजार फी वसूल करण्यात येणार आहे. फेरीवाल्याने एकाच दिवसात जागा बदलल्यास अतिरिक्त बाजार फी वसूल करण्यात येणार आहे.
ना-फेरीवाला क्षेत्रातील वसुलीस बंदी असतानाही ठेकेदार त्यांच्याकडून वसुली करीत आहेत. ही वसुली केल्यास ठेकेदारावर दंडात्मक तसेच तेथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वसुली करणाऱ्याने मान्यतेचे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- अनेक नियम आणि कायदे करूनही फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी अतिरिक्त बाजार फी वसूल करत होते. लाचलुचपत विभागाने असा प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आणि त्यांनी याबाबत निश्चित दराप्रमाणेच बाजार फी देण्याचा माहिती फलकच बाजार परिसरात लावला आहे.
पालिकेच्या या निर्णयाचा आता कितपत फायदा होतो, आणि यामुळे पालिका कर्मचाऱ्यांवर काही वचक बसतो का, हे पाहणे गरजेचे आहे. आता नव्याने लावण्यात आलेल्या या माहिती फलकामुळे हे देखील लवकरच कळेल.

Web Title: Flood transit on extra recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.