कल्याण-डोंबिवलीत दररोज पाच हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST2021-04-08T04:40:43+5:302021-04-08T04:40:43+5:30

कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सध्या दिवसाला पाच हजार जणांची ...

Five thousand tests per day in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत दररोज पाच हजार चाचण्या

कल्याण-डोंबिवलीत दररोज पाच हजार चाचण्या

कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सध्या दिवसाला पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मनपाची रुग्णालये, चाचणी केंद्रे, तसेच खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी मनपाने चाचण्यांवर भर दिला आहे. मनपाने याव्यतिरिक्त बस डेपो आणि कल्याण रेल्वेस्थानकातही चाचणी केंद्र सुरू ठेवले आहे. कोरोनाचे निदान लवकर झाल्यास रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होते. त्यामुळेच चाचण्या वाढविण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. मनपा हद्दीत दररोज पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे. कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २३ टक्के आहे. हे प्रमाण १० टक्क्यांच्या आत असायला हवे. कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर हा ४३ दिवसांवर आला आहे.

मनपाने मागील वर्षापासून आतापर्यंत एकूण चार लाख ९१ हजार ९३७ जणांची चाचणी केली आहे. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४६२ जणांची अँटिजन, तर दोन लाख १४ हजार ४७५ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. सुरुवातीस आरटीपीसीआर चाचणीसाठी दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतली जात होती. आता ही रक्कम नियंत्रित करण्यात आली आहे. डॉ. रजनीकांत देसाई म्हणाले, आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जातात. घरी जाऊन चाचणी केल्यास ७०० रुपये घेतले जात आहेत.

‘लस तातडीने उपलब्ध करून द्या’

- राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांनुसार रिक्षा, टॅक्सी आणि बसचालकांनी १० एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायची आहे. १५ दिवसांची वैधता ठरविली आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांतील कामगारांनाही आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. ही चाचणी करून घेण्याची जबाबदारी दुकानमालकाची आहे; अन्यथा त्यांचे दुकान बंद करण्याची कारवाई केली जाईल.

- मात्र, आरटीपीसीआर चाचणीचा ५०० रुपयांचा खर्च परवडणार नसल्याने या सगळ्य़ांना कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी दुकानदार व रिक्षाचालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

---------------------------

Web Title: Five thousand tests per day in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.