दरोडेखोरांच्या टोळीच्या तपासासाठी पाच पथके
By Admin | Updated: April 22, 2017 02:36 IST2017-04-22T02:36:36+5:302017-04-22T02:36:36+5:30
येथील नौपाडा भागातून पकडलेल्या दरोडेखोरांच्या सखोल तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच स्वतंत्र पथकांची निर्मिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केली आहे.

दरोडेखोरांच्या टोळीच्या तपासासाठी पाच पथके
- जितेंद्र कालेकर, ठाणे
येथील नौपाडा भागातून पकडलेल्या दरोडेखोरांच्या सखोल तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच स्वतंत्र पथकांची निर्मिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केली आहे. प्रत्येकी तीन दरोडेखोरांच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश या पाच पथकांना दिले आहेत.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये लूटमार करून धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीच्या ‘कारनाम्यां’ची व्याप्ती लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषण विभागातील केवळ एका अधिकाऱ्याकडे हा तपास देण्यापेक्षा पाच वेगवेगळ्या निष्णात अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, युनिट-२ भिवंडीच्या शीतल राऊत, युनिट-४ उल्हासनगरचे संजय साबळे, युनिट-५ वागळे इस्टेटचे मदन बल्लाळ आणि खंडणीविरोधी पथकाचे निवृत्ती कदम या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रत्येक पथकाकडून आता टोळीतील प्रत्येकी तिघांचा तपास पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
सोने गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या खासगी संस्थेमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १५ दरोडेखोरांच्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. ठाण्याच्या नौपाड्यातील मुथूट फायनान्स, मीरा रोड येथील अरिहंत ज्वेलर्स आणि बोईसर येथील एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकून लूटमार करण्याची त्यांची योजना होती. ही एक मोठी आंतरराज्य टोळी असून त्यांनी आतापर्यंत देशातील अनेक ठिकाणी दरोडे टाकले आहेत. त्यांच्या चौकशीत असुद्दीन शेख, महमद जमीर अली, बरकत शेख, सेनाऊल शेख (रा. सर्व झारखंड) या चौघांच्या टोळीने दीड वर्षांपूर्वी अर्नाळा येथील सराफाच्या दुकानातून अडीच कोटींचे सात किलोचे सोने लुटले होते. तर, अब्दुल माजिद शेख आणि उमर रज्जाक शेख यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मुंबईच्या काळा चौकी भागात दरोडा टाकला होता.