उल्हासनगर महापालिकेचे पाच सुरक्षारक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:56 IST2019-05-11T23:56:24+5:302019-05-11T23:56:37+5:30
महापालिकेच्या सहायक आयुक्तांना शिवीगाळ होत असताना बघ्याची भूमिका घेतल्याने पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

उल्हासनगर महापालिकेचे पाच सुरक्षारक्षक निलंबित
उल्हासनगर : महापालिकेच्या सहायक आयुक्तांना शिवीगाळ होत असताना बघ्याची भूमिका घेतल्याने पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारपूर्वी सुरक्षारक्षकांचे निलंबन मागे घ्या, नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेने पालिकेला दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केल्याने भूमाफिया व स्थानिक नगरसेवकांचे धाबे दणाणले होते. मंगळवारी कारवाईचा अहवाल देण्यासाठी महापालिका मुख्यालयात आलेले सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना एका मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांपैकी बाजीराव जाधव, ज्ञानेश्वर पवार, रमेश पवार, शांताराम दिघे, विनोद झोनवाल व दिनेश रिसवाल आदींनी मनसे पदाधिकाºयाला अटकाव करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली, असा ठपका ठेवून २४ तासांची कारणे दाखवा नोटीस बजावली. सहापैकी पाच सुरक्षकांनी नोटिशीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात निलंबित कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षारक्षकांना या प्रकारात जाणीवपूर्वक निलंबित केल्याचा आरोप कामगार संघटनेचे नेते दिलीप थोरात यांनी केला. वरिष्ठ अधिकांऱ्यांची त्यांनी भेट घेत मंगळवारपूर्वी सुरक्षारक्षकांचे निलंबन मागे घेण्याचा इशारा दिला. अन्यथा महापालिकेविरोधात आंदोलन करावे लागणार असल्याचे संकेत दिले.
‘प्रभारी मुकादमावर कारवाई करा’
महापालिकेने सफाई कामगारांमधील काही जणांची प्रभारी मुकादमपदी नियुक्ती केली आहे. प्रभारी मुकादमांच्या प्रभागांत बेकायदा बांधकामे फोफावली आहेत. यातूनच शिंपी यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. प्रभारी मुकादम व त्यांच्या प्रभागांची चौकशी करून बेकायदा बांधकामे झाल्याचे उघड झाले तर, त्यांच्यावर सक्त कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दिन शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.
गणेश शिंपी यांनी शुक्रवारी आकाश कॉलनीतील रुंदीकरणाआड येणारी अनेक घरे जमीनदोस्त केली आहेत. या वेळी माजी महापौर पाटील यांच्या कंपाउंडची भिंतही पाडण्यात आली.