महामार्गावर ट्रक चालकाचा खून करणारे पाचजण गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:43 IST2019-03-10T23:41:15+5:302019-03-10T23:43:55+5:30
भिवंडी : अहमदाबाद महामार्गावर ट्रकचे चालकासह अपहरण करून मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर ...

महामार्गावर ट्रक चालकाचा खून करणारे पाचजण गजाआड
भिवंडी : अहमदाबाद महामार्गावर ट्रकचे चालकासह अपहरण करून मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर चालकाचा पाचजणांच्या टोळक्यांनी खून केला. मृत ट्रकचालकांच्या वारसाचा शोध घेत पोलीसांनी बारा दिवसांत पाच आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले. त्यांना कोर्टात हजर केले असता सोळा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश भिवंडी न्यायालयाने दिले आहेत.
सुभाष छबीराज यादव(४५)असे मृत ट्रक चालकाचे नांव असुन तो उत्तरप्रदेश आजमगढ येथील परशुरामपूर मध्ये रहात होता. बारा दिवसांपुर्वी त्याचा मृतदेह बंद ट्रकमध्ये चालकाच्या कॅबीनमध्ये आढळून आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलीसांनी आरोपींचा तपास सुरू केला होता. दरम्यान मृत चालकाचा सहकारी चालक मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख (३६)यांस तलासरी येथुन ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने चौघांच्या मदतीने सुभाष यादव याची हत्या केल्याची कबुली पोलीसांना दिली.
आरोपी चालक मोहम्मद अजमल याने त्यांच्या साथीदारांशी संगनमत करून सिमेंटचे पेव्हर ब्लॉक घेऊन लोणावळ्यास जाणारा ट्रक मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाट मार्गावर अडविला. तेथुन पाचजणांनी ट्रकचे चालकासह अपहरण करून त्यास भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावर आणले. तसेच या टोळक्याने ट्रकमधील सिमेंटचे ब्लॉक काळ्या बाजारात विकण्याचे ठरविले.त्यांना ट्रक चालक सुभाष यादव याने विरोध केला.त्यामुळे त्याच्या डोक्यावर लोखंडाच्या टॉमीने प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यास ट्रकमधील चालकाच्या कॅबीनमध्ये टाकून सर्व पसार झाले. मात्र आरोपी मोहम्मद अजमल याने ही हकीकत सांगीतल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गोवंडीतील मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख (३०),मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख(३३), भिवंडीतील गैबीनगर येथुन जहान जेब अमीन खान(२३) तर अन्सारनगर येथुन मोहम्मद इम्रान अलील खान(३५) यांना अटक केली. आज रविवार रोजी पाचही जणांना न्यायालयांत हजर केले असता न्यायालयाने १६ मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेवरून महामार्गावरील गुन्हेगारी उघडकीस आली आहे.