कल्याण-डोंबिवलीत आढळले आणखी पाच रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:47 AM2020-04-13T01:47:37+5:302020-04-13T01:47:48+5:30
एकूण ५५: ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका व पालिका रुग्णांच्या तुलनेत संख्या सर्वाधिक
कल्याण : केडीएमसी हद्दीत रविवारी आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका व पालिकांच्या हद्दीतील रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे.
डोंबिवलीत पूर्वेत रविवारी १९ वर्षांच्या तरुणाला, तर कल्याण पूर्वेतील १२ आणि १५ वर्षांच्या दोन मुलींसह १५ वर्षांचा मुलगा आणि ४३ वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक १९ रुग्ण, तर टिटवाळा परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत.
दुसरीकडे उपचारांदरम्यान दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील १२ कोरोनाबाधितांना उपचारांती घरी सोडले आहे. त्यामुळे सध्या ३७ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दिव्यात शनिवारी एक कोरोना बाधित आढळल्याने तेथे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. तसेच ठाणे महापालिकेने व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दिव्यातील कोरोना संशयितांची चाचणी करावी. तसेच निर्जंतुकीकरण, धूर फवारणी करावी, अशी मागणी केली आहे.
सहा महिन्यांचे बाळ सुखरूप घरी परतले
कल्याणमधील सहा महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याने त्याला शनिवारी कस्तुरबा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाळ व त्याच्या आईला घेऊन रुग्णवाहिका त्यांच्या सोसायटीत येताच इमारतीतील रहिवाशांनी त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले, अशी माहिती मनसेच्या नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी दिली.