निवडणूक कामांसाठी पाचसदस्यीय समिती
By Admin | Updated: December 29, 2016 02:59 IST2016-12-29T02:59:38+5:302016-12-29T02:59:38+5:30
आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पाच जणांची समिती महापालिका प्रशासनाने गठीत केली आहे. त्याचबरोबर, निवडणूक निर्णय
निवडणूक कामांसाठी पाचसदस्यीय समिती
ठाणे : आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पाच जणांची समिती महापालिका प्रशासनाने गठीत केली आहे. त्याचबरोबर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कामे वगळता अन्य कामे करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी विविध विभागांतील ८५ अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठामपाची निवडणूक येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच, पालिका प्रशासनाने निवडणूकपूर्व कामांची तयारी सुरू केली आहे. तसेच ठामपा क्षेत्रातील प्रभागनिहाय मतदारांची प्रारूप यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली. त्यापाठोपाठ आता निवडणुकीच्या अन्य कामांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच, निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवण्याकामी प्रशासनाने पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून निवडणुकीच्या कामकाजासाठी जवळपास १६ ते २० निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारीवर्ग नियुक्त केला जाणार आहे. या अधिकाऱ्यांमार्फतच निवडणुकीची कामे केली जाणार असून त्या कामकाजाचे स्वरूप मोठे असल्याने या अधिकाऱ्यांची कामे वगळता अन्य कामांसाठी पालिका अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जवळपास ८५ कामांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यासाठी पालिकेच्या एका अधिकाऱ्याला समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना सातत्याने पालिकेच्या विभागांशी संपर्क साधावा लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन केली आहे. यामध्ये महापालिका मुख्यालय उपायुक्त संजय निपाणे, उपायुक्त (निवडणूक) ओमप्रकाश दिवटे, शहर विकास विभागाचे अधिकारी प्र.ल. गोहील, नगरअभियंता रतन अवसरमोल आणि विकास ढोले या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच महापालिका मुख्यालय उपायुक्त निपाणे हे नोडल आॅफिसर असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.