महिलेच्या पोटात पाच किलोचा गोळा
By Admin | Updated: February 6, 2017 02:44 IST2017-02-06T02:44:26+5:302017-02-06T02:44:26+5:30
मुंबईतील ३९ वर्षीय महिलेच्या ओटीपोटातील चरबीचा भाग वाढल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही काळाने ही चरबी नसून, फायब्रॉइड असल्याचे निदान झाले

महिलेच्या पोटात पाच किलोचा गोळा
मुंबई : मुंबईतील ३९ वर्षीय महिलेच्या ओटीपोटातील चरबीचा भाग वाढल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही काळाने ही चरबी नसून, फायब्रॉइड असल्याचे निदान झाले, हा फायब्रॉइड तिच्या आतड्यात वाढत होता. ही बाब डॉक्टरांच्या वेळीच लक्षात आल्याने, त्या महिलेवर शस्त्रक्रिया करून ५.५ किलो वजनाचा फायब्रॉइड काढून, तिच्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंशुमाला शुक्ल आणि शल्यविशारद डॉ.जयदीप घोलप यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
युटेरिन लायोमायोमाटाला ‘युटेरिन फायब्रॉइड’ म्हणून ओळखले जाते. त्याची सुुरुवात स्नायूंपासून होते आणि त्याचे गट बनू लागतात. ३५ वर्षांवरील महिलांमध्ये २०-३० टक्के इतक्या प्रमाणात फायब्रॉइड दिसून येतात. आधुनिक जीवनशैली आणि पुढे ढकलण्यात येणारे प्रजननाचे निर्णय, यामुळे हे प्रमाण हल्ली वाढत आहे, तसेच या फायब्रॉइडचे सहजासहजी निदान होत नाही. कारण ते गर्भाशयाच्या बाजूला लागून वाढतात. तर या फायब्रॉइडमुळे वेदना आणि ओटीपोटात अस्वस्थ वाटते, परंतु काही वेळा त्याची काहीही लक्षणे दिसत नाही. ते अगदी अपघाताने सापडतात.
या महिलेच्या ओटीपोटात कठीण चरबी असल्याचे आढळले, परंतु कुठल्याही तपासणीत विचित्र फायब्रॉइडसारखे काहीही आढळले नाही. त्यानंतर, आणखी बारीक तपासणी केल्यानंतर १२ बाय १३ सेंटिमीटर आकाराचा फायब्रॉइड त्यांच्या मोठ्या आतड्यात दिसला. लेप्रोस्कोपिक पद्धतीने फायब्रॉइड आणि गर्भाशय काढून टाकायचा निर्णय घेतला, परंतु आतड्यातून होणारा असामान्य रक्तपुरवठा पाहता, ओपन सर्जरीचा निर्णय घेण्यात आल्याचे रोबोटिक सर्जन आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंशुमाला शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)