पाच गोदामे खाक
By Admin | Updated: May 5, 2017 05:57 IST2017-05-05T05:57:03+5:302017-05-05T05:57:03+5:30
तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत अरिहंत कम्पाउंडमधील कॅट वॉक चप्पल व बूट बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामास गुरुवारी

पाच गोदामे खाक
भिवंडी : तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत अरिहंत कम्पाउंडमधील कॅट वॉक चप्पल व बूट बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामास गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. यात पाच गोदामे जाळून खाक झाली. कामगार गोदामात नसल्याने पुढील अनर्थ टळला.
अरिहंत कम्पाउंड येथील ई-३ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कॅट वॉक चप्पल बूट बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामास सकाळी साडेसहा वाजता आग लागली. याची माहिती स्थानिक अग्निशमन नियंत्रण कक्षास ९ वाजता मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. गोदाम बंद असल्याने पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे काचेची तावदाने तोडून बाहेरून पाणी मारून आग विझवण्याचे काम जवान करीत होते. आग नियंत्रणात येत नसल्याचे पाहून कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशमन दलास पाचारण केले.
परिसरात पाण्याची व्यवस्था नसल्याने चार तासांनंतर आग आटोक्यात आली. गोदामांमध्ये आग विझवण्याची साधने नसल्याने आग वेळीच आटोक्यात आणता येत नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत वेळ जातो. या गोदामपट्ट्यातील गोदामात उन्हाळ्यात वारंवार आगी लागतात. त्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून केवळ गोदामपट्ट्यासाठी अद्ययावत अग्निशमन दलाची उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)