सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणार्‍या पाच भिक्षेकरींवर ठाण्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:10 PM2017-12-20T16:10:30+5:302017-12-20T16:17:58+5:30

शहरातील सिग्नल आणि रेल्वे स्थानक, बाजारपेठ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी भिक्षेकरी पादचारी तथा वाहनधारकांना त्रास देतात. भिक्षा मिळेपर्यंत त्यांची वाट अडवतात. भिक्षेकरीमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत अशा भिक्षेकरींविरूद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली.

five beggers booked by Thane Police | सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणार्‍या पाच भिक्षेकरींवर ठाण्यात कारवाई

सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणार्‍या पाच भिक्षेकरींवर ठाण्यात कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे पोलिसांचा पुढाकारसार्वजनिक ठिकाणी पाहणीभिक्षेकरींची सुधारगृहात रवानगी

ठाणे : भिक्षेकरीमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत पाच भिक्षेकरींवर ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण पथकाने कारवाई केली. ठाण्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिकार्‍यानी दिली.
ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी, चौकांमध्ये भिक मागणारी मंडळी हमखास दिसतात. लहान मुलांना समोर करून हे भिक्षेकरी वाहतुकीला अडथळाही निर्माण करतात. वाहनधारकांना हे भिक्षेकरी त्रस्त करून सोडतात. वाहनधारक खिसा सैल करेपर्यंत ते वाट अडवतात. प्रत्येक सिग्नलवर कार चालकांच्या खिडकीजवळ हे भिक्षेकरी कारला खेटून उभे राहतात. सिग्नल हिरवा झाल्यावरही भिक्षेकरी वाहनापासून दूर होत नाही. संपूर्ण शहरात हे चित्र पहावयास मिळते.
सध्या राज्यभरात भिक्षेकरीमुक्त अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ठाण्यातील भिक्षेकरींवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी ठाण्याच्या बाल संरक्षण पथकाला दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण आणि त्यांच्या सहकार्‍यानी सोमवारी सकाळी कापूरबावडी येथील आशापुरा माता मंदिर आणि रेल्वे स्थानकाजवळ कारवाई केली. यावेळी भिक्षा मागताना सापडलेल्या तीन महिला आणि दोन पुरूषांना ताब्यात घेण्यात आले.
अशा प्रकारच्या कारवाईमध्ये आरोपींना हजर करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि ठाणे क्षेत्रासाठी कुर्ला येथे एकमेव न्यायालय आहे. या न्यायालयासमोर भिक्षेकरींना हजर केले असून, त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरींच्या सुधारगृहात करण्यात येत असल्याची माहिती अधिकार्‍यानी दिली. भिक्षा मागणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव भिक्षेकरूंना करून देत, यापुढे भिक्षा मागताना दिसल्यास पुन्हा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी भिक्षेकरींना यावेळी दिला.

Web Title: five beggers booked by Thane Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.