मासळी बाजार जमीनदोस्त
By Admin | Updated: May 5, 2017 05:58 IST2017-05-05T05:58:00+5:302017-05-05T05:58:00+5:30
महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी अवध चौकातील मासळी मार्केटची इमारत जमीनदोस्त केली

मासळी बाजार जमीनदोस्त
उल्हासनगर : महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी अवध चौकातील मासळी मार्केटची इमारत जमीनदोस्त केली. यापूर्वी पथकावर दगडफेक झाल्याच्या घटनेने आयुक्त संतप्त झाले होते. त्यांनी स्वत: उपस्थित राहून २० ते २५ दुकानांवर तसेच श्रीराम चौकातील चार बारवरही कारवाई केली.
उल्हासनगर कॅम्प नं.-२ येथील अवध चौकात भरणाऱ्या बेकायदा मासळी बाजारामुळे वाहतूककोंडी व्हायची. बुधवारी सहायक आयुक्त अलका पवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यासाठी पथक गेले. मात्र, पथकावर दगडफेक झाल्याने कारवाई थांबवली. पथकावर झालेल्या दगडफेकीची माहिती आयुक्तांना कळताच त्यांनी संताप व्यक्त केला.
गुरुवारी दुपारी प्रभाग क्रमांक १ व २ च्या सहायक आयुक्तांसह पथकाला मासळी बाजाराच्या कारवाईसाठी सज्ज राहा, असा संदेश आयुक्त शिंदे यांनी पाठवला. त्यानंतर आयुक्तांनी स्वत: अवध चौकातील बाजारामध्ये जाऊन कारवाईचे आदेश दिले. सहायक आयुक्त अजित गोवारी, अलका पवार यांच्या पथकाने जेसीबीने २० ते २५ दुकाने जमीनदोस्त केली. कारवाईदरम्यान आयुक्तांकडे क्षमा मागण्यासाठी आलेल्या दुकानदारांना हल्ल्याची आठवण करून दिली. तसेच कारवाई नियमानुसार असल्याचे सांगून अडथळा निर्माण केल्यास गुन्हे दाखल करण्याचा धमकीवजा इशारा दिला. दुसरीकडे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने श्रीराम चौकातील गोल्डन गेट, अॅपल, राखी व हण्ड्रेड डेज या डान्स बारमधील छुप्या खोल्यांसह तळ मजल्यावरील दुकाने जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)
माजी नगरसेवकाला आयुक्तांनी सुनावले
पोलिसांच्या पत्रानुसार बारमधील छुप्या खोल्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली. हण्ड्रेड डेज बारमधील छुप्या खोल्यांवर कारवाई सुरू होती. त्या वेळी बारचा मालक व स्थानिक माजी नगरसेवक तेथे आला. आयुक्त सुधाकर शिंदे यांना कारवाई थांबवण्याची विनंती करून नियमित करण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले. आयुक्तांनी माजी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केल्यावर त्याने घरी जाणे पसंत केले.