‘फर्स्ट कम, फर्स्ट बेसिस’ची घोषणा पोकळ
By Admin | Updated: February 4, 2017 03:35 IST2017-02-04T03:35:46+5:302017-02-04T03:35:46+5:30
ग्रंथदालनातील स्टॉल्सला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशकांकडून एक पुस्तक भेट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे ३५० प्रकाशकांकडून

‘फर्स्ट कम, फर्स्ट बेसिस’ची घोषणा पोकळ
पु.भा. भावे साहित्यनगरी : ग्रंथदालनातील स्टॉल्सला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशकांकडून एक पुस्तक भेट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे ३५० प्रकाशकांकडून ३५० वाचकांना एक पुस्तक भेट मिळणार होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून हा पायंडा पडणार होता. परंतु, त्याबाबत प्रकाशक आणि विक्रेत्यांना काहीच माहीत नव्हते. त्यामुळे पहिल्या वाचकाला पुस्तकच मिळाले नसल्याने ही घोषणा पोकळ ठरली आहे.
साहित्य संमेलनातील ग्रंथदालन, महामंडळ आणि आयोजक यांच्यात समन्वय साधला जावा, यासाठी प्रथमच प्रकाशक समितीची स्थापना केली होती. या समितीत महामंडळाचे तीन पदाधिकारी आणि आयोजन समितीचे तीन सदस्य आहेत. असे असतानाही प्रकाशक आणि विके्रत्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचली नसल्याचे उघड झाले.
डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात ग्रंथदालनाची सोडत पार पडली. त्या वेळी मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी ग्रंथदालनात प्रत्येक स्टॉलला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशकाकडून एक पुस्तक भेट मिळणार असल्याचे सांगितले होते. यंदाच्या साहित्य संमेलनापासून त्याचा पायंडा पडणार होता. परंतु, प्रत्यक्षात विक्रेते आणि प्रकाशक यांना याविषयी कोणतीच माहिती नव्हती.
या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार होते. पण, त्यांच्या गैरहजेरीमुळे संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पाडला. (प्रतिनिधी)
पहिल्या वाचकाला पुस्तक भेट देण्याच्या योजनेविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती. या उपक्रमाची माहिती असती, तर आम्ही नक्कीच याला प्रोत्साहन दिले असते. मराठी भाषा वाढावी आणि मराठी माणसांपर्यंत ती जास्तीतजास्त पोहोचावी, हाच आमचा उद्देश आहे. आताही त्यांनी या योजनेविषयी सांगितल्यास आम्ही एका वाचकाला पुस्तक भेट देऊ.
- सुरेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली