सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

By Admin | Updated: February 21, 2016 02:34 IST2016-02-21T02:34:31+5:302016-02-21T02:34:31+5:30

ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे.

The first experiment of collective farming was successful | सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

- वसंत भोईर,  वाडा
ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. हा पहिला प्रयोग येथील तरुण शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर आंबिस्ते बु. येथील शेतकरी संजय पाटील व कोंडू पाटील यांच्या शेतातील बटाटे काढण्यात आले. काढलेले बटाटे शांतिदूत ग्रुप फार्मिंगमार्फत थेट ग्राहकांना घरपोच पुरवण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पाटील यांनी दिली.
तालुक्यातील देवघर, गांध्रे, आंबिस्ते बु., ढाढते, घोटमाळ, पालसई, विलकोस, निचोळे, बावेघर, शेलटा, बोरांडा या गावांत सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्यांची लागवड केली आहे.
बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता तयार झाले आहे. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागले असून एकरी २३ हजार झाडे बसतात तर पीक १० ते १५ टनांपर्यंत येते. एका एकरावर शेती केल्यास हंगामी १ लाख ४० हजारांपर्यंत नफा मिळतो.

शेतकऱ्यांची खंत...
वाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची खंत आंबिस्ते येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
नोकरीपेक्षा जास्त पैसा आपण कमावू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आहे. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी नवी हरितक्रांती घडवण्यासाठी बटाट्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे.

बटाटा शेतीही तालुक्यात नव्हे तर कोकणात प्रथमच केली जात असावी, म्हणून येथील शेतकऱ्यांच्या सहली काढून त्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यानंतर, येथील शेतकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर ही शेती सोपी व जास्त उत्पन्न देणारी असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने ती येथे सुरू केली आहे. बटाटा शेती या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात केली असली तरी पुढील वर्षात ५०० एकर क्षेत्रात करण्याचा विचार आहे.

वेफर्ससाठी हा बटाटा ९० दिवसांत तयार होतो, तर भाजीसाठी ७५ दिवसांत तयार होतो. येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिदूत ग्रुप फार्मिंगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटा शेतीसाठी बी-बियाणेतज्ज्ञ गणेश पवार व तज्ज्ञ शेतकरी अरुण मोरे, परदेशातील तज्ज्ञांनीही या शेतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

Web Title: The first experiment of collective farming was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.