आधी धरण, मग नदीचे रुंदीकरण
By Admin | Updated: March 29, 2017 05:27 IST2017-03-29T05:27:28+5:302017-03-29T05:27:28+5:30
मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

आधी धरण, मग नदीचे रुंदीकरण
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याच नदीवर पेंढरी येथे ११ कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या धरणाच्या जमीनमोजणीचे काम पूर्ण झाले असून, यासाठी लाखो रुपये खर्चसुद्धा झाले आहेत. परंतु, धरणाच्या बांधावर टोपलेभर मातीदेखील पडली नसताना या नदीचे रुंदीकरण करून ठराविक अंतरावर सिमेंट काँक्रिटचे बंधारे बांधण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला पेंढरी धरण संघर्ष समितीने प्रखर विरोध केला असून, प्रथम कमी खर्चात होणारे धरण बांधा, नंतर कनकवीरा नदीचे खोलीकरण आणि सिमेंट काँक्रि टचे बंधारे बांधा, असा निर्णय घेतला आहे. तसे पत्र परिसरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीने शिवसेना नेते सुभाष घरत व पी.एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. तसेच आमदार किसन कथोरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदने देण्यात आली आहेत.
कनकवीरा नदीवर पेंढरी येथे धरणाचे बांधकाम करावे, असा प्रस्ताव माजी मंत्री कै. शांतारामभाऊ घोलप यांनी १९७७ मध्ये मांडला होता. मात्र २०११ मध्ये याला प्रथम प्रशासकीय मान्यता मिळून २०१३ मध्ये या धरणाचे ११०० कोटींचे टेंडर मंजूर करण्यात आले. हे काम मे. तुळजा गजानन कन्ट्रक्शन नाशिक या एजन्सीला देण्यात आले आहे. धरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या असून जमिनीची मोजणी झालेली आहे. यासाठी ठेकेदाराने लाखो रुपये खर्च केले आहेत. हा शासनाचा खर्च असूनही ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नद्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील कनकवीरा नदीची निवड करून यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील ११ गावांची सिंचन क्षमता वाढून ५०० हेक्टरपेक्षा जास्त वाढणार आहे. या योजनेस परिसरातील शेतकरी व पेंढरी धरण संघर्ष समितीचा विरोध नाही. ही योजना जिल्हाधिकाऱ्यांनी जरूर राबवावी. परंतु, ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पेंढरी धरणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. (वार्ताहर)