CoronaVirus News: आधी कोरोनाशी, आता मदतीसाठी लढा; कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या नशिबी संघर्षच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:41 IST2020-10-04T23:41:16+5:302020-10-04T23:41:27+5:30
सरकारी मदत मिळाली नसल्याने कुटुंबे झाली हतबल

CoronaVirus News: आधी कोरोनाशी, आता मदतीसाठी लढा; कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या नशिबी संघर्षच
- जितेंद्र कालेकर
ठाणे : कोरोनाच्या काळातील बंदोबस्तात झोकून देऊन पोलीस नाईक श्रीकांत वाघ यांनी ड्युटी बजावली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कर्तव्यावर असतानाच कोरोनामुळे ते शहीद झाले. सरकारी मदतीची रक्कम मंजूर झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळालेली नाही. माझा माणूस गेला! खूप हताश झाले... अशी हतबलता खाकी वर्दीतल्या या कोविडयोद्धयाची पत्नी संगीतिका श्रीकांत वाघ यांनी व्यक्त केली.
कोरोनाची चाचणी करण्याआधी दीड आठवड्यांपासून श्रीकांत यांना सर्दी, खोकला, खांदेदुखी आणि दम लागणे, असा त्रास होत होता. सुरुवातीला त्रास जाणवल्यानंतर कळवा येथील रुग्णालयात त्यांनी औषधोपचार सुरू केले होते. १९ आॅगस्ट रोजी रात्रपाळी करून २० आॅगस्ट रोजी सकाळीच घरी गेल्यानंतर श्रीकांत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल त्याचवेळी मिळाला. श्रीकांत यांच्यामागे पत्नी, श्रुती (२७) आणि श्रेया (२५) या दोन मुली आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५० लाखांचे अनुदान जाहीर केले. ते मंजूर झाल्याचे वाघ कुटुंबीयांना सांगण्यात आले आहे, पण ते कधी आणि कोण देणार, याची कोणतीच माहिती नाही. त्यामुळे अजून सरकारी मदत, भविष्य निर्वाह निधी यापैकी कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे संगीतिका यांनी सांगितले.