अखेर...उल्हासनगरात नाले सफाईला सुरवात; जेसीबी मशीन उतरविली वालधुनी नदीत
By सदानंद नाईक | Updated: May 16, 2023 16:30 IST2023-05-16T16:29:53+5:302023-05-16T16:30:12+5:30
उल्हासनगर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात लहान-मोठे ४६ नाल्याची सफाई मंगळवारी पासून सुरवात केली

अखेर...उल्हासनगरात नाले सफाईला सुरवात; जेसीबी मशीन उतरविली वालधुनी नदीत
उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची सुरवात मंगळवारी दुपारी जेसीबी मशीन वालधुनी नदीत उतरून करण्यात आली. मोठ्या नाल्यानंतर लहान नाल्याची सफाई सुरू करण्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात लहान-मोठे ४६ नाल्याची सफाई मंगळवारी पासून सुरवात केली. ४६ पैकी ८ मोठे नाले असून त्याची सफाई जेसीबी मशिनद्वारे करण्यात येणार आहे. तर लहान शहरांतर्गत नाल्याची सफाई कंत्राटी कामगारा मार्फत करण्यात येणार आहे. नाल्यातून निघालेला गाळ व केरकचरा त्याच वेळी डंपरद्वारे डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त कल्पना जुईकर, जमीर लेंगरेकर, स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे आदींच्या उपस्थितीत नाले सफाईसाठी जेसीबी मशीनची पूजा करून सफाईसाठी वालधुनी नदीत उतरविण्यात आली आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास, संभाव्य पूरपरिस्थितीच्या दृष्टीने नाले सफाईचे काम महापालिकेने ठेकेदारा मार्फत सुरू केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी शहरातून वाहणाऱ्या नदी व नाल्यात कोणताही कचरा टाकल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. १५ जूनपूर्वी १०० टक्के नालेसफाई होईल. असे नियोजन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल. असे सांगण्यात आले. आयुक्त अजीज शेख येत्या आठवड्यात नाले सफाईचे आढावा घेणार आहेत. तसेच नाल्या तुंबलेल्या असल्यास नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.