योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण!
By Admin | Updated: January 24, 2017 05:45 IST2017-01-24T05:45:58+5:302017-01-24T05:45:58+5:30
वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा अभिनव उपक्रम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी

योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण!
ठाणे : वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा अभिनव उपक्रम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सुरू केला आहे. ‘आरटीओ’च्या अखत्यारितील अत्याधिक महत्त्वाचे हे काम पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
व्यावसायिक वापरासाठी नवीन वाहन विकत घेताना दोन वर्षे मुदतीचे योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर, मात्र ही वाहने रस्त्यावर धावण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत अथवा नाही, याबाबतचे प्रमाणपत्र दरवर्षी ‘आरटीओ’कडून घेणे बंधनकारक असते. वाहनांची ही योग्यता तपासण्याची प्रक्रिया तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावी, यासाठी न्यायव्यवस्था आग्रही आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य नसलेली वाहने रस्त्यावर धावतात आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. अपघातांचे वाढते प्रमाण विचारात घेता वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निर्दोष पद्धतीने व्हावी, यासाठी परिवहन विभागाने ठोस पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
वाहनांची योग्यता तपासण्यासाठी ‘आरटीओ’च्या सर्व कार्यालयांकडे किमान २५० मीटर लांबीची स्वत:ची जागा असावी, या मुद्यावरही न्यायालय आग्रही असून ही व्यवस्था करण्याबाबत न्यायालयाने परिवहन विभागास बजावलेही आहे. स्वमालकीच्या जागेचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सुरू आहे. सद्य:स्थितीत वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचे काम ठाण्यातील कशेळी आणि कोलशेत भागात केले जाते.
स्वमालकीच्या जागेचा प्रश्न सुटेपर्यंत, वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार, गत दोन दिवसांपासून चित्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कॅमेरामनची व्यवस्थाही कार्यालयाने केली आहे.
अशा प्रकारचे चित्रीकरण करण्याची व्यवस्था पुणे, लातूर आणि औरंगाबादसारख्या ‘आरटीओ’च्या राज्यातील मोजक्या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. या कार्यालयांकडे वाहनांची योग्यता चाचणी घेण्यासाठी स्वमालकीची जागा आहे. ठाणे कार्यालयात मात्र स्वमालकीची जागा नसतानाही हा उपक्रम सुरू आहे. या निर्णयामुळे हे महत्त्वाचे काम पारदर्शक पद्धतीने पार पडण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)