मनसेने आंदोलन केले म्हणून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:32+5:302021-04-04T04:41:32+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पूल तयार करण्याची कामे संथगतीने सुरू असल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ मनसेने ठाकुर्ली पुलावर एप्रिल फूल ...

मनसेने आंदोलन केले म्हणून गुन्हा दाखल
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पूल तयार करण्याची कामे संथगतीने सुरू असल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ मनसेने ठाकुर्ली पुलावर एप्रिल फूल डब्बा गूल... हे आंदोलन केले होते. हे आंदोलन करणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, वडवली रेल्वे उड्डाणपूल लोकार्पण आणि कोपर पुलाच्या गर्डर लाँचिंगची गर्दी करणा-यांविरोधात का गुन्हा दाखल केला नाही. तो कधी दाखल होणार, असा सवाल शिवसेनेचा नामोल्लेख न करता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात ट्विट करून पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलीस आयुक्तांना केले आहे. वडवली पुलाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी चांगलीच गर्दी केली होती. कोपर पुलाच्या गर्डर लाँचिंगच्या वेळीही शिवसेनेसह भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. वडवली पुलाच्या लोकार्पणाच्या वेळी पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्तही उपस्थित होते. पोलिसांनी या गर्दीकडे डोळेझाक करून कोरोना नियमावलीचा भंग केला म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही. महाविकास आघाडीच्या सत्तेत शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्यांविरोधात कोरोनाचा गुन्हा दाखल करण्याकडे पोलिसांनी हात आखडता घेतला. मनसेचे आंदोलन हे पुलाची कामे संथगतीने सुरू आहेत. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी होते, असे त्यांनी म्हटले आहे.
----------------