आमदाराच्या भावाविरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 21, 2015 00:52 IST2015-11-21T00:52:15+5:302015-11-21T00:52:15+5:30
मीरा रोडच्या कनकिया भागात तिवरांची झाडे तोडून तिवर व क्षेत्रात मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने भाजपा आमदाराच्या भावाविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार

आमदाराच्या भावाविरोधात गुन्हा दाखल
मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया भागात तिवरांची झाडे तोडून तिवर व क्षेत्रात मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने भाजपा आमदाराच्या भावाविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार मीरा रोड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे याआधी २०१० सालीदेखील त्याच्यावर तिवरांचा ऱ्हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
कनकिया मार्गाच्या शेवटी बिल्डर लॉबी, राजकारणी, जमीनमालक, महापालिका व पोलिसांसह स्थानिक महसूल विभागाच्या आशीर्वादाने कनकिया भागात वारंवार गुन्हे दाखल होऊनदेखील तिवरांचा सातत्याने ऱ्हास केला जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून वारंवार होत आहे. हे क्षेत्र पाणथळ, सीआरझेड व कांदळवनाने बाधित असताना मातीभराव करून भूखंड तयार झाले आहेत. तिवरांची झाडे कापून मातीभराव सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाल्यानंतर गुरुवारी महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तिवरांची झाडे कापल्याचे व मातीभराव झाल्याचे आढळल्यानंतर मौजे नवघर सर्व्हे क्र. २६४ मधील मे. सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकीची जागा असल्याने संचालक विनोद लालचंद मेहताविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विनोदवर २०१० साली याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तो भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा लहान भाऊ आहे. मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.