भविष्यात पाण्यासाठी होणार मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:37 IST2017-08-01T02:37:26+5:302017-08-01T02:37:26+5:30
पर्यावरणाचा ºहास होत असल्याने निसर्गाची हानी होत आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्यामुळे शेती मार खात आहे.

भविष्यात पाण्यासाठी होणार मारामारी
डोंबिवली : पर्यावरणाचा ºहास होत असल्याने निसर्गाची हानी होत आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्यामुळे शेती मार खात आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी, तर शहरीभागात उद्योग व पिण्यासाठी पाण्याची मारामार आहे, हे चित्र आणखी विदारक होत जाणार. २०४० मध्ये पाण्याची चोरी होणार, असे भाकित पर्यावरणावर आधारित एका छोट्याशा नाटिकेतून सादर करण्यात आले.
शहरातील सावित्रीबाई फुले कलामंदिराचा दहावा वर्धापन दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त पर्यावरण दक्षता मंडळाने सादर केलेल्या नाटिकेद्वारे वरील विषय मांडण्यात आला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमास परिवहन समिती सभापती संजय पावशे, भाजपा गटनेते वरुण पाटील, नगरसेवक महेश पाटील, केडीएमसीचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, उद्योजक मधुकर चक्रदेव, आरोग्य अधिकारी विलास जोशी, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार, नाट्य परिषदेचे शिवाजी शिंदे, माजी नगरसेविका मंगला सुळे, श्रीकला संस्कार अकादमीच्या दीपाली काळे, गणेश मंदिर संस्थानचे प्रवीण दुधे, नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रेय लधवा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीसाई कला अकादमीने या वेळी कथ्थक नृत्य सादर केले. रागिनी भक्तिगीत मंडळातर्फे जोगवा नृत्य सादर करण्यात आले.
स्वच्छ भारतवर लघुचित्रफीत
‘स्वच्छ भारत’ अभियानावर एक लघुचित्रफीत दाखवण्यात आली. स्वच्छ भारताची मोहीम वारकरी राबवतात. कलाकारांनीही त्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. राधिका नायक, माधवी गांगल, एकता पाटील यांनी भरतनाट्यम् सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. संबळवादन, पाश्चिमात्य नृत्य, गौरी कवी यांची गाणी, लोकनृत्य असे विविध प्रकार या वेळी सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देशपांडे यांनी केले. सौरभ सोहनी व मधुरा ओक यांनी निवेदन केले.
भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनीसांगितले की, ‘फुले कलामंदिरापासून सुरू करण्यात आलेली परिवहनची बस आता कायमस्वरूपी सुरू राहील.’
दरम्यान, या कार्यक्रमास महापालिका प्रशासनाने निधी दिलेला नव्हता. स्थानिक कलाकारांनी हा कार्यक्रम उचलून धरत सादर केला. त्यात आघाडीचे कलाकार सहभागी झालेले नव्हते. तसेच कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती नव्हती.
सकाळी झाले नटराजपूजन
सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते नटराजपूजन झाले. सायली शिंदे यांच्या शिष्यांनी ईशस्तवन सादर केले. त्यानंतर, वक्रतुंड ही नांदी सादर करण्यात आली. यानिमित्त पूजाही झाली. याप्रसंगी केडीएमसी उपायुक्त धनाजी तोरसकर, करनिर्धारक संकलक अनिल लाड, सहायक आरोग्य अधिकारी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.