भिवंडीत वाहतूक पोलिसांना मारहाण
By Admin | Updated: March 27, 2017 03:45 IST2017-03-27T03:45:43+5:302017-03-27T03:45:43+5:30
आनंद दिघे चौकात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारला जॅमर लावल्याचा राग आल्याने कारचालक आणि त्याच्या

भिवंडीत वाहतूक पोलिसांना मारहाण
भिवंडी : आनंद दिघे चौकात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारला जॅमर लावल्याचा राग आल्याने कारचालक आणि त्याच्या साथीदाराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केली. दोघांनाही अटक झाली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल झाला.
आनंद दिघे चौक ते एसटी स्थानकादरम्यान सरकारी कार्यालये आहेत. या भागात कोठेही कार्यालयांबाहेर पार्किंगसाठी जागा नाही. तसेच या रस्त्यावर ‘नो पार्किंग’चे बोर्डही लावलेले नाहीत. बापगाव येथील रहिवासी कैलास पारीख व मीरा रोड येथील भाविन मेहता यांनीही २३ मार्चला रिजेंन्ट हॉटेलसमोर कार लावली आणि ते आत गेले. येथे नेहमी दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात. मात्र, ही नवीन गाडी दिसल्याने पोलिसांनी तिला जॅमर लावला. याचा जाब विचारल्याने वाहतूक पोलीस शिपाई शिंदे यांनी पारीख याचे लायसन्स ताब्यात घेतले. तोवर पोलीस निरीक्षक गणपतराव घाडगे तेथे आले. तेव्हा कारला जॅमर लावण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, पारीख याने घाडगे यांची कॉलर पकडून त्यांना गाडीबाहेर खेचत जमिनीवर पाडले, तर भाविन मेहता याने शिपाई शिंदे याला धक्का देत त्यांच्या हातातील लायसन्स खेचून घेतले. (प्रतिनिधी)