अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ३५ सिनेमांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:41+5:302021-02-24T04:41:41+5:30

अंबरनाथ : कोरोना संकटामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सव रद्द करावे लागले असले तरी अंबरनाथ मराठी चित्रपट ...

Feast of 35 Cinemas at Ambernath Marathi Film Festival | अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ३५ सिनेमांची मेजवानी

अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ३५ सिनेमांची मेजवानी

अंबरनाथ : कोरोना संकटामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सव रद्द करावे लागले असले तरी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव मात्र मर्यादित स्वरूपात का होईना साजरा होत आहे. यंदा या महोत्सवात ३५ चित्रपट दाखल झाले असून अलीकडेच या सर्व चित्रपटांचे परीक्षण पूर्ण झाले आहे. येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारितोषिकांचे वितरण होणार आहे. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच वर्षे हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. यंदा सहाव्या वर्षी कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम सादर करण्यासाठी मर्यादा आली असली तरी महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कथा-पटकथा लेखक महेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने हा महोत्सव भरवला जातो. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि त्यांचे चित्रपटप्रेमी सहकारी दरवर्षी तो साजरा करीत असतात.

यंदा या महोत्सवात केसरी, अन्य, ई-मेल फिमेल, फनरल, श्रीराम समर्थ, प्रीतम, प्रवास, स्वप्न आदी ३५ चित्रपट दाखल झाले आहेत. महोत्सवात विविध विभागात ४५ पुरस्कार दिले जातात. संभाव्य विजेत्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. व्ही.एन. मयेकर यांना तंत्रज्ञ गौरव तर श्रीकांत मोघे यांना कारकीर्द गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करणारे कलावंत, तंत्रज्ञ यांची या महोत्सवात पुरस्कार देऊन दखल घेतली जाते.

------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Feast of 35 Cinemas at Ambernath Marathi Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.