ठाणे : नाले आणि फुटपाथवरील अतिक्रमणावर सलग दुसऱ्या दिवशी ठाणे महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली असून मंगळवारी मात्र बाजारपेठेत या कारवाईच्या दरम्यान दुकानदार आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दुकानावरील फलकदेखील पालिकेने काढण्यास सुरु वात केल्याने संतप्त झालेल्या दुकानदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे ७५ अतिक्रमणे तोडून काही वेळानंतर पालिकेला कारवाई थांबवावी लागली. नाले आणि फुटपाथ मोकळे करण्याचा सपाटा पालिकेने लावला असून शहरातील सर्वच प्रभाग समितीमध्ये मंगळवारी कारवाई केली. अशाच प्रकारे ठाणे बाजारपेठेमध्ये ती सुरु झाल्यानंतर दुकानदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये काही टपऱ्या असून त्या हटवल्यामुळे आपला रोजगार निघून गेल्यामुळे अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. या धक्क्याने एक महिला बेशुद्धदेखील पडली. दुकानावरील बोर्ड तरी हटवू नये अशी मागणी दुकानदारांची होती. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वातावरण अधिक तापले. अखेर आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दुकानदारांनी बोलावल्यानंतर त्यांनी दुकानदारांची बाजू समजून घेतली. अधिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी काही वेळानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. कळवा प्रभाग समितीअंतर्गतही... कळवा प्रभाग समितीअंतर्गतही कळवा नाका ते आत्माराम पाटील चौकच्या रस्त्याच्या दोहोबाजूला असलेल्या फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी ७५ अतिक्रमणे तोडल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.
पालिकेच्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये संताप
By admin | Updated: October 7, 2015 16:24 IST