ठाण्याच्या युद्धभूमीवर सेनापतींसह फौजा सज्ज
By Admin | Updated: July 9, 2016 03:44 IST2016-07-09T03:44:55+5:302016-07-09T03:44:55+5:30
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महापालिका निवडणुकीच्या युद्धभूमीवर लढण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी आपले सेनापती निश्चित केले असून आता आपले सैन्य घेऊन ते तुंबळ

ठाण्याच्या युद्धभूमीवर सेनापतींसह फौजा सज्ज
ठाणे : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महापालिका निवडणुकीच्या युद्धभूमीवर लढण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी आपले सेनापती निश्चित केले असून आता आपले सैन्य घेऊन ते तुंबळ युद्धाकरिता सज्ज होणार आहेत. या सेनापतींमध्ये एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, नारायण राणे, जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश परांजपे यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे सेनापती एकनाथ शिंदे यांच्या भात्यात जनसंपर्क, विजयाकरिता सर्वस्व पक्षाला लावण्याची तयारी, बंडखोरांना थंड करण्याचे कसब असे रामबाण आहेत. रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या युद्धभूमीवर केलेली तलवारबाजी पाहून मंत्रालयातील श्रीमंतांनी त्यांना आता ठाण्याच्या मोहिमेवर धाडले आहे. चव्हाण यांच्या तलवारीला जनसंपर्काची धार आहे तसेच मैदान मारण्याकरिता अपार कष्ट करण्याची ताकद त्यांच्या मनगटात आहे.
जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा मतदारसंघातील आमदार असल्याने मुस्लिम समाजाची मते आपल्या उमेदवारांच्या मागे उभी करून शत्रूला गारद करण्याचा दारूगोळा ते जमवू शकतात. आनंद परांजपे हे सोशल मीडियावरील युवकांमध्ये अचूक संदेश धाडून शत्रूपक्षाच्या सैन्याची दाणादाण उडवण्याची चाणक्यनीती रचण्यात वाकबगार आहेत. नारायण राणे हे हाडाचे लढवय्ये आहेत. कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेले राणे हे नेहमीच युद्धभूमीवर राहिले आहेत. लढाई शत्रूंशी असो की स्वकीयांशी - वेगवेगळी शस्त्रास्त्रे कशी वापरायची, ते त्यांना माहीत आहे. शिवाय, राष्ट्रवादी या मित्रपक्षाची साथ मिळवून निकराची लढाई ते करतील, असा काँग्रेसला विश्वास वाटतो. दहीहंडी, गणपती, नवरात्रीपासून या युद्धाचे पडघम वाजण्यास सुरूवात होईल.
युद्धभूमीवरील हे सेनापती अंगावर चिलखते चढवून... आरोप-प्रत्यारोपांच्या नंग्या तलवारी चालवत... सोशल मीडियावरील खऱ्याखोट्या प्रचारांची भालेफेक करीत एकमेकांवर तुटून पडतील, तेव्हा महापालिका निवडणुकीची रणधुमाळी उडून युद्धभूमीवर एकच हलकल्लोळ उडेल. अर्थात, या युद्धपटाकरिता मुहूर्त पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील काढलेला आहे. (प्रतिनिधी)
चव्हाण यांच्यावर मोठी भिस्त
शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाण्याची गादी हिसकावून घेण्याकरिता रवींद्र चव्हाण यांना भाजपाने मंत्रीपदाच्या अंबारीत बसवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चव्हाण यांना त्याकरिता रसद पुरवणार असले, तरी प्रत्यक्ष मैदानात सेनापती या नात्याने शिंदे यांच्यासोबत तलवारबाजी करण्याची जबाबदारी चव्हाण यांच्या खांद्यावर असेल.
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे लढवय्ये सेनापती जितेंद्र आव्हाड यांना गनिमी काव्याने शत्रूपक्षावर चाल करण्यास मोकळे ठेवले आहे. पण, प्रत्यक्ष मैदानातील चेहरा आनंद परांजपे यांचा दिला आहे.
ठाण्यातील या युद्धभूमीचे मूक साक्षीदार हे सांस्कृतिक मैफलीत रमणारे, काव्याचा आस्वाद घेणारे सृजनशील ठाणेकर असल्याने परांजपे यांचा सोज्वळ चेहरा युद्धभूमीवर राहील.
राणेंचाही दांडपट्टा
काँग्रेसने माजी मंत्री व आमदार नारायण राणे यांना आखाड्यात उतरवले आहे. राणे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वाधिक काळ दांडपट्टा फिरवत कुठल्या ना कुठल्या शत्रूपक्षावर तुटून पडणारे लढवय्ये सेनापती राहिले आहेत.
मराठी मतविभाजन हाच कळीचा मुद्दा
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उदय झाल्यापासून गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय मतदार हा भाजपाकडे आकर्षित झाला असून मुंबई, ठाणे येथील निवडणुकीत तो एकगठ्ठा भाजपाच्या मागे उभा करण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न राहील.
ठाण्यात या समाजाची मते लक्षणिय आहेत. मराठी मतदार
हा बहुसंख्य असला तरी उच्चभ्रू, सुशिक्षित मराठी वर्गावर मोदींची जादू आहे.
शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मदार मराठी मतांवर असेल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पारड्यातही काही मराठी मते जातील.
त्यामुळे भाजपा अमराठी मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाली आणि मराठी मतांचे विभाजन झाले तर त्याचा फटका शिवसेनेला बसून ठाण्यातही कल्याण-डोंबिवलीप्रमाणे भाजपा पाचपट वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई पालिकेतील युद्धाचे लोणही येणार ठाण्यात
मुंबई महापालिकेच्या कुरुक्षेत्रावर होणाऱ्या रणकंदनाकरिता शिवसेना व भाजपाचे योद्धे बाहू सरसावून तयार आहेत. भाजपाने ११४ जागांचे मिशन निश्चित करून शिवसेनेला सुईच्या अग्रावर राहील इतकी राजकीय जमीन शिल्लक न ठेवण्याचा चंग बांधला आहे.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने मिशन १५१ जाहीर करून शिष्टाईचे दरवाजे बंद केले होते. त्याचा वचपा आता सत्तेतील मोठा भाऊ झालेला भाजपा काढत आहे. मुंबईतील युद्धाचे लोण ठाण्यात पोहोचायला वेळ लागणार नाही.
मुंबईत शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांची उणीदुणी काढत असताना ठाण्यात गळ््यातगळे घालण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत जे घडले त्याच टोकाच्या संघर्षाच्या किंबहुना त्याहून अधिक तीव्र संघर्षाच्या ठिणग्या ठाणे, मुंबईत उडणार आहेत.