फातिमा रस्ता : रिक्षा जाईल इतकाच रस्ता खुला, नागरिक हतबल
By Admin | Updated: March 31, 2017 06:13 IST2017-03-31T06:13:57+5:302017-03-31T06:13:57+5:30
शिवसेनेच्या नगरसेवकाने नागरिकांना वेठीस धरून फातिमा रस्ता बंद ठेवला आहे. हा रस्ता सुरू करण्याचे आदेश

फातिमा रस्ता : रिक्षा जाईल इतकाच रस्ता खुला, नागरिक हतबल
अंबरनाथ : शिवसेनेच्या नगरसेवकाने नागरिकांना वेठीस धरून फातिमा रस्ता बंद ठेवला आहे. हा रस्ता सुरू करण्याचे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी देऊनही हा रस्ता पालिकेने पूर्ण खुला केलेला नाही. टीकेची झोड उठताच पालिका अधिकाऱ्यांनी केवळ एक रिक्षा जाईल इतकाच रस्ता खुला केला आहे. निगरगट्ट पालिका प्रशासनापुढे अंबरनाथचे नागरिक हतबल झाले आहेत.
शहरातील महत्त्वाचा रस्ता असलेला फातिमा रस्ता चार महिन्यांपासून बंद ठेवला आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी हा रस्ता बंद केल्याने नागरिकांनीही कळ सोसली. मात्र, १० दिवसांपूर्वीच रस्त्याचे काम पूर्ण झालेले असतानाही खुला करण्यात आला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी शिवसेना नगरसेवकाने हा रस्ता मुद्दाम बंद करून ठेवला आहे. रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच खासदार शिंदे यांनी हा रस्ता तत्काळ खुला करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, आदेश आल्यावर नगरसेवकाच्या सांगण्यावरून या ठिकाणी नव्या रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचे खोटे कारण पुढे करून हा रस्ता खोदण्यात आला.
मुळात जलवहिनी जीवन प्राधिकरणाने या ठिकाणी टाकलेलीच नाही. या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. असे असताना केवळ नागरिकांची अडवणूक करण्यासाठी हा रस्ता बंद केला. पालिका अधिकाऱ्यांना रस्ता खुला करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही अधिकाऱ्यांनी ४० फूट रस्त्यापैकी केवळ चार फुटांचा रस्ता नागरिकांसाठी खुला केला. उर्वरित रस्त्यावर खडी टाकून तो तसाच बंद ठेवला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेची प्रतिमा मलिन
पालिका प्रशासन आणि नगरसेवकाच्या या निगरगट्टपणापुढे नागरिक हतबल झाले आहेत. केवळ श्रेय घेण्यासाठी नागरिकांची केलेली कोंडी ही शिवसेनेची प्रतिमा मलिन करणारी ठरत आहे.