सरकारी पुरस्कार परत करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
By Admin | Updated: March 21, 2017 01:44 IST2017-03-21T01:44:43+5:302017-03-21T01:44:43+5:30
एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा

सरकारी पुरस्कार परत करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
बदलापूर : एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा आपला संघर्ष तीव्र केला आहे. योग्य दाबाने, पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे. हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कृषीदिनी राज्य सरकारकडून मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील उल्हासनदी किनारी काराव, इंदगाव येथील शेतकऱ्यांना चार वर्षांपासून अनियमित आणि कमी दाबाने वीजपुरवठा होतो. परिणामी, चार वर्षात त्यांचे किमान चाळीस वीजपंप जळाले आहेत. वीज पुरवठ्यासंदर्भात काराव येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, रमेश देशमुख, दिलीप देशमुख व विलास देशमुख यांनी अनेकदा वीज वितरण विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र तरीही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मार्च २०१३ ला उपअभियंत्यांना त्यांनी पहिले पत्र दिले. त्यानंतर फेबु्रुवारी २०१४ ला कल्याणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. तरीही कारवाई न झाल्याने जुलै २०१४ ला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा उपअभियंत्यांना निवेदन दिले. या नंतर एक अधिकारी तेथे आला. त्याने पाहणी केली. ‘यावर उपाय म्हणजे तुमच्या खर्चाने खांब बसवून घ्या. म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल,’ असे त्यांना सांगितल्याचे विलास देशमुख म्हणाले. आम्ही शासनाकडे कर्जमाफी मागत नाही की वीज बिलात सूटही मागत नाही. वेळच्या वेळी आम्ही बिले भरत असतो. असे असताना गेल्या चार वर्षांपासून वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करण्याची मागणी लोकशाही मार्गाने करूनही जर आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल, तर आम्हालाही आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे दिलीप देशमुख म्हणाले. कृषी विभागाकडून चांगले सहकार्य मिळते. मात्र वीज खात्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. येथील गंजलेले खांब आणि वीजवाहिन्या तातडीने बदलून योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठा करावा. पुरवठा महिन्याभरात सुधारला नाही, तर येत्या कृषीदिनी शासनाचे सर्व पुरस्कार शासनाला परत करू, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)