‘समृद्धी’ला शेतकऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: March 31, 2017 05:50 IST2017-03-31T05:50:32+5:302017-03-31T05:50:32+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गासाठी लागणाऱ्या जमीनमोजणीसाठी आलेल्या तहसीलदारांसह

‘समृद्धी’ला शेतकऱ्यांचा विरोध
खर्डी : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गासाठी लागणाऱ्या जमीनमोजणीसाठी आलेल्या तहसीलदारांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील गोलभण गामस्थांनी प्रचंड विरोध केला. या वेळी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.
गुरु वारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोलभण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना जमीनमोजणीच्या नोटिसा दिल्या. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यातच जमीनमोजणीस संभाव्य बाधा निर्माण करतील, या हेतूने शहापूर तहसीलदारांनी दळखण, जरंडी, गोलभण येथील संघर्ष समितीच्या सदस्यांना चॅप्टर केसेससंदर्भात जबाब देण्यासाठी शहापूर कार्यालयात हजर राहावे, असे आदेश दिले. ते तिकडे जाताच इकडे परस्पर जमीन मोजण्यासाठी तहसीलदार स्वत: आल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मोजणीसाठी आलेल्या सरकारी ताफ्याला रस्त्यातच अडवून त्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला.
या वेळी वृद्ध महिलांची संख्या अधिक होती. तहसीलदारांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, जमलेल्या महिला आणि शेतकरी कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यामुळे तेथील वातावरण चांगलेच तापलेले होते. (वार्ताहर)