क्लस्टरच्या मोठ्या घरांसाठी जादा पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:50 AM2018-04-24T01:50:06+5:302018-04-24T01:50:06+5:30

ठाणे शहरात क्लस्टर योजना ४४ सेक्टरमध्ये राबवली जाणार आहे.

Extra money for big cluster homes | क्लस्टरच्या मोठ्या घरांसाठी जादा पैसे

क्लस्टरच्या मोठ्या घरांसाठी जादा पैसे

Next

ठाणे : ठाणे शहरात क्लस्टर योजना ४४ सेक्टरमध्ये राबवली जाणार आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात ती पाच सेक्टरमध्ये राबवली जाणार असून त्याअंतर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाणार आहे. येत्या आॅक्टोबर महिन्यात राबोडी, कोपरी, लोकमान्यनगर आणि किसननगर भागात तिचा श्रीगणेशा होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. या योजनेत, ३०० चौरस फुटांपर्यंत मोफत घर उपलब्ध होणार आहे. परंतु, त्यापेक्षा एखाद्याला जास्त चौरस फुटांचे घर हवे असल्यास ३०० चौरस फुटांपुढील क्षेत्रासाठी त्याला कन्स्ट्रक्शन्स कॉस्टनुसार पैसे मोजावे लागणार आहेत. कोपरीमध्ये होणाऱ्या क्लस्टरचे सादरीकरण रविवारी झाले. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
क्लस्टरचे सादरीकरण नुकतेच महासभेतदेखील झाले आहे. त्यात प्रत्येक सेक्टरचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून त्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालये, पोलीस ठाणे, गार्डन आदींसह इतर सुविधा उपलब्ध आहेत. याचा अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे तयार केलेल्या नव्या अर्बन रिन्युअल प्लानमध्ये शहराच्या विकास आराखड्यातील शिल्लक राहिलेल्या बाबींचादेखील समावेश केला जाणार आहे. त्यानुसार, लोकसंख्येच्या मानाने ज्या काही सुविधा देणे बंधनकारक असतील, त्या देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय, बाधित आरक्षणेदेखील या माध्यमातून विकसित केली जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
राबोडी म्हणजे गजबजलेल्या परिसराचा विकास हा पहिल्या टप्प्यात होणार आहे. ३७.९१ हेक्टर एरिया असून त्यामध्ये ०.८५ टक्के परिसर हा सीआरझेडने बाधित आहे. तर, किसननगरमध्ये १६०.३७ हेक्टरचा विकास क्लस्टरअंतर्गत केला जाणार आहे. यामध्ये ०.०९ टक्के परिसर हा फॉरेस्टने व्यापला आहे. तर, लोकमान्यनगरच्या ६०.५१ हेक्टर परिसराचा विकास हा क्लस्टरअंतर्गत होईल. यात ०.६५ टक्के एरिया हा फॉरेस्टचा आहे. या जागांचे अंतिम आराखडे तयार असून निविदादेखील आता काढल्या जाणार आहेत. त्यानुसारच नागरिकांच्या मतांचा कौल आता घेतला जात आहे.

ठाण्याचा पूर्व भाग असलेल्या कोपरीमध्ये गावठाणाचा भागदेखील येत आहे. तसेच ४५.९० हेक्टर परिसरापैकी १.२७ टक्के परिसर हा सीआरझेडने व्यापलेला आहे. तर, कोपरी गावठाणचा ५.९४ हेक्टर एरिया आहे. त्यानुसार, या परिसराचा आता विकास केला जाणार आहे. आजवर हा भाग पालिकेकडून सतत दुलर्क्षित राहिला. विविध प्रकल्पांतून तेथील वाहतुकीचे नियोजनही आता कुठे सुरू झाले आहे.

Web Title: Extra money for big cluster homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर