तज्ज्ञ डॉक्टर, फायर एनओसी नसतानाही रुग्णालयाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:44 IST2020-09-26T23:44:48+5:302020-09-26T23:44:59+5:30
नोटीस बजावून कारवाई करणार । ठाणे पालिकेची माहिती

तज्ज्ञ डॉक्टर, फायर एनओसी नसतानाही रुग्णालयाला परवानगी
ठाणे : कोलशेत रोड येथे सुरू झालेल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु, सदर रुग्णालयाने कोणत्याही प्रकारे महापालिकेच्या किंवा अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन केले नसताना आणि तज्ज्ञ डॉक्टर नेमले नसताना त्याला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. यानुसार, या रुग्णालयाची पाहणी करून नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी महासभेप्रमाणेच स्थायी समितीची बैठकही आॅनलाइन घेण्यात आली. महासभेत ज्या पद्धतीने चर्चा न करता विषयांना मंजुरी देण्यात आली, तसे काही प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत झालेले दिसून आले नाही. या बैठकीत कोविडचे अनेक विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवले होते. त्या अनुषंगाने भोईर यांनी कोलशेत रोडवरील या रुग्णालयातील महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला. हे रुग्णालय नुकतेच सुरू केले आहे. सध्या या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, रुग्णालय सुरू करताना फायर एनओसी, फायरच्या नियमानुसार दोन जिने आवश्यक असताना तेदेखील नाहीत. फायरच्या दृष्टीने जे काही नियम पाळणे बंधनकारक आहे, त्याची कुठेही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाला परवानगी दिलीच कशी, असा सवालही त्यांनी केला आहे. हॉस्पिटल सुरू करताना एमडी फिजिशिअन असणे आवश्यक असते.
मात्र, तेदेखील येथे नेमले नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने रुग्णालय सुरूच कसे, असा सवाल त्यांनी केला. यावर प्रशासनाने नियमानुसार परवानगी देण्यात आली असून तीन महिन्यांत सर्व कागदपत्रे सादर करू, असे रुग्णालयाने सांगितले असल्याचे सांगितले. परंतु, ही प्रक्रिया रुग्णालय सुरू करण्यापूर्वीच होणे अपेक्षित होते, तसे झालेले नसल्याने सदर रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. त्यानुसार, आता सोमवारी संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.