बदलापूरच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांवर खर्च
By Admin | Updated: February 23, 2017 05:45 IST2017-02-23T05:45:35+5:302017-02-23T05:45:35+5:30
कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे करवाढीला बगल देण्यात आली आहे.

बदलापूरच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांवर खर्च
बदलापूर : कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे करवाढीला बगल देण्यात आली आहे. मात्र जुन्याच प्रकल्पासाठी पुन्हा आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार त्याचा उल्लेख मात्र केलेला नाही. बाह्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर अथर्संकल्पात सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
करवाढ नसलेला बदलापूरचा ९ लाख ४९ हजारांचा शिलकी अथर्संकल्प बुधवारी सभागृहात सादर करण्यात आला. ५३८ कोटी ७९ लाखांच्या या अर्थसंकल्पात उत्पन्नापेक्षा अनुदानावर सर्वाधिक भर आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, बाह्यवळण रस्त्यांचे
कॉंक्रि टीकरण आदी नवीन तरतुदींबरोबरच बोटॅनिकल गार्डन, स्टेडियम, नाट्यगृह आणि प्रशासकीय इमारत या जुन्याच घोषणांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. याच प्रकल्पांवर आधीही तरतुद केली होती. मात्र त्या प्रकल्पांचे काम सुरु न झाल्याने यावर्षी त्याच प्रकल्पांवर पुन्हा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी अथर्संकल्प मांडला. यावेळी उपनगराध्यक्ष शरद तेली, भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आशिष दामले व्यासपीठावर उपस्थित होते.
गेल्या वर्षी नव्याने भांडवली मूल्यावर आधारित कररचना केल्याने मालमत्ता कराचे उत्पन्न १० कोटींनी वाढले होते. त्यात साधारणत: २४ हजार नव्या मालमत्तांचा समावेश झाल्याने यंदा कोणत्याही नव्या कराची वाढ करण्यात आलेली नाही.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तीन कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील प्रवेशद्वारांवर कमानी लावून सुशोभीकरणावर दीड कोटी, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दीड कोटींची तरतूद आहे. वालीवली भागात बोटॅनिकल गार्डनचे आश्वासनही देण्यात आले आहे. नगरोत्थानासाठी ११० कोटी, बाह्यवळण रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. नाट्यगृहाचे पुन्हा आश्वासन दिले असून त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सभेच्या सुरु वातीला भाजपाचे संजय भोईर यांनी आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प आधी स्थायी समितीत मंजूर करणे अपेक्षित असताना तो सर्वसाधारण सभेत मांडून प्रथा मोडण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. आचारसंहितेमुळे सभा घेण्यास उशीर झाल्याचे नगराध्यक्ष म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)