विद्यमान १०० नगरसेवक रिंगणात
By Admin | Updated: February 7, 2017 04:07 IST2017-02-07T04:07:45+5:302017-02-07T04:07:45+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वपक्षीयांमधील तब्बल १३० आणि ५ स्वीकृत अशांपैकी १०० नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आहेत

विद्यमान १०० नगरसेवक रिंगणात
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वपक्षीयांमधील तब्बल १३० आणि ५ स्वीकृत अशांपैकी १०० नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आहेत. दुसरीकडे निवडणुकीत ५० टक्के आरक्षण महिलांना मिळाले आहे. त्यानुसार, शिवसेनेने महिलांना तब्बल ५५ टक्के आरक्षण दिले असून त्याखालोखाल भाजपा आणि काँग्रेसने ५२ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ ४५ टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. तर, मनसेनेदेखील ४८ टक्के महिलांना निवडणुकीत संधी दिली आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता ७ फेब्रुवारीनंतर प्रत्यक्षात रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहणार, हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी सध्या ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतून १३१ उमेदवार निवडून पालिकेत जाणार आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या विद्यमान १३५ (१३० + ५) नगरसेवकांपैकी १०० विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १५ नगरसेवकांना तिकीट मिळाले नसले, तरी त्यांनी आपली पत्नी, वहिनी, भाऊ यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपाने आपल्या पाच विद्यमान नगरसेवकांना तिकीट दिले असून सेना, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसमधून आयात केलेल्या १० जणांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ४२ विद्यमान नगरसेवक रिंगणात उतवले असून इतर पक्षांतून आलेल्या १० जणांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे ३४ पैकी ८ नगरसेवक शिवसेना-भाजपात दाखल झाले असून उर्वरित नगरसेवकांपैकी २३ जणांना पुन्हा तिकीट मिळाले आहे. तर, १७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसची पूर्ण वाताहत झाली असून त्यांचे फक्त ४ विद्यमान नगरसेवक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षासोबत असलेल्या एकमेव नगरसेविकेला त्यांनी उमेदवारी दिली. दरम्यान, महापालिकेत ५० टक्के म्हणजेच ६६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. (प्रतिनिधी)