उल्हासनगरात माजी सैनिकांचा आत्मदहनाचा इशारा मागे, आयुक्त शेख, नगररचनाकार मुळे यांची मध्यस्थी यशस्वी
By सदानंद नाईक | Updated: August 14, 2022 21:50 IST2022-08-14T21:49:09+5:302022-08-14T21:50:49+5:30
आयुक्त अजीज शेख व नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला.

उल्हासनगरात माजी सैनिकांचा आत्मदहनाचा इशारा मागे, आयुक्त शेख, नगररचनाकार मुळे यांची मध्यस्थी यशस्वी
उल्हासनगर: भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतलेले माजी सैनिक सुभाष पाटील यांनी विविध मागण्यासाठी स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर पोलीस व महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. आयुक्त अजीज शेख व नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला.
उल्हासनगर कॅम्प नं-४, संभाजी चौकात परिसरात राहणारे माजी सैनिक सुभाष पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठविलेल्या निवेदनात विविध समस्याचे निराकरण होत नसल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करूनही समस्याचे निराकरण होत नसल्याने, ते दुःखी झाले होते. पाटील यांच्या देशाच्या अमृतमहोत्सव स्वातंत्र दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने, महापालिका, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले.
महापालिका आयुक्त अजीज शेख व नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी पुढाकार घेऊन पाटील यांच्या सोबतच्या मध्यस्थीला यश आले. शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार त्यांचे घर नियमित करण्याचे लेखी आश्वासन नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी देऊन इतर मागण्याचा विचार महापालिका करणार असल्याचे सांगितले. स्वतः नगररचनाकार मुळे यांनी माजी सैनिक सुभाष पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढून महापालिकेचे आश्वासनपर पत्र दिले. महापालिका आयुक्त अजीज शेख व नगररचनाकार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर, मी आत्मदहनाचा इशारा मागे घेत आहे. अशी माहिती सुभाष पाटील यांनी पत्रकारांना दिली.